सातारा : टंचाईच्या उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील टँकर फिडींग पॉईंटमध्ये धरणातून पाणी सोडण्यात आले असून हे पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या फिडींग पॉईंटचे पाणी उपसा करुन शेतीला देऊ नये, कोणी शेतीला पाणी देत असल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज टंचाई आढावा बैठक पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे आदी उपस्थित होते.
धरणातील पाणी पातळी कमी झाली असल्यामुळे धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील वरच्या गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे, अशा गावांकडून टँकरची मागणी आल्यास तात्काळ सर्व्हे करुन 7 दिवसाच्या आत टँकर सुरु करा, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. शिवतारे पुढे म्हणाले, खंडाळा तालुक्यातील अहिरे या गावाला तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी भेट द्यावी. तेथे चारा छावणीची गरज असल्यास तसा प्रस्ताव सादर करावा प्रस्तावाला तात्काळ मंजुरी दिली जाईल.
गावांना टँकरचे पाणी देताना सन 2019 लोकसंख्येचा विचार करुन पाणी द्यावे. प्रत्येक माणसी 20 लिटर व प्रत्येक जनावराला 35 लिटर या प्रमाणे पाणी देण्यात यावे. जिल्ह्यात 260 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ठरवून दिलेल्या खेपांप्रमाणे टँकर खेपा घालत नसतील तर दंडात्मक कारवाई करावी. चारा छावणी चालकांना जनावरांसाठी लांबून पाणी आणावे लागत होते. आता चारा छावण्यांना शासनच पाणी पुरवठा करणार असल्याने चारा छावणी चालकांचा मोठा प्रश्न सुटला आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने विहिरी अधिग्रहित केलेल्या आहेत, या विहिरींना विज कनेक्शन तात्काळ द्यावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी विद्युत विभागाला करुन जिल्ह्यातील धरणातील उपलब्ध पाणीसाठा हा पिण्यासाठीच राखीव ठेवावा. तसेच टँकर फिडींग पॉईटमधून कोणीही अवैधरित्या शेतीसाठी पाणी उपसा करत असेल तर त्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या. 229 गावांतील व 932 वाड्यातील 3 लाख 79 हजार 522 बाधीत लोकांना व 1 लाख 94 हजार 161 पशुधनाला 260 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. ज्या गावातून टँकरची मागणी आल्यास तात्काळ मंजुरी द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल या बैठकीत केल्या.या टंचाई आढावा बैठकीस सर्व प्रांताधिकारी, सर्व तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टँकर फिडींग पॉईंटमधील पाणी अवैधरित्या उपसा करणार्यावर तात्काळ गुन्हे दाखल कराः विजय शिवतारे
RELATED ARTICLES