सातारा (विंदा करंदीकर नगरी जि.प.मैदान) :सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर जानेवारी 5 ते 8 अखेर एकोणिसाव्या ग्रंथ महोत्सवाला प्रारंभ होत असल्याची माहिती समितीचे कार्यवाह प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपाध्यक्ष वि. ना. लांडगे, कार्यवाह शिरीष चिटणीस, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, साहेबराव होळ, सहसमन्वयक प्रल्हाद पार्टे, नंदा जाधव, डॉ. राजेंद्र माने, ल. गो. जाधव, शेखर हसबनीस, सुनील बंबाडे यांची उपस्थिती होती. महोत्सवातील विविध कार्यक्रमांची माहिती देताना प्राचार्य डॉ. पाटणे म्हणाले, गेली 18 वर्षे सातार्याला सांस्कृतिक मेजवानीने संपन्न करणारा ग्रंथ महोत्सव यंदा 19 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. यंदाचे वर्ष हे प्रसिद्ध कवी विंदा करंदीकर यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने यावर्षी ग्रंथ महोत्सवाच्या नगरीला विंदा करंदीकर नगरी असे नाव देण्यात आले आहे. यंदाच्या ग्रंथ महोत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे सध्या महाराष्ट्रात सर्वत्र गाजत असलेल्या संभाजी मालिकेतील प्रमुख भूमिकेत असलेले डॉ.अमोल कोल्हेंसह, मालिकेचे पटकथा व लेखक व सातार्याचे सुपुत्र प्रताप गंगावणे, दिग्दर्शक कार्तिक केंडे, विवेक देशपांडे, छोटी येसूबाई आभा बोडस, छोटे संभाजी दिवेश मेदगे या कलाकारांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे.
ग्रंथ महोत्सवात पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर येथील प्रसिद्ध प्रकाशन संस्थांनी सुमारे 110 स्टॉलच्या माध्यमातून यावेळी पुस्तक विक्री करण्यासाठी नाव नोंदणी केली असल्याची माहिती कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी दिली. यावेळी ग्रंथदिंडीतील पालखीतील ज्ञानेश्वरीबरोबर संविधानाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
सातारा शहरातील सर्व शाळा, सर्व साहित्यिक, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध संस्था यांना प्रत्यक्ष निमंत्रण दिल्याचे उपाध्यक्ष वि. ना. लांडगे यांनी यावेळी दिली.
शुक्रवार दि. 5 रोजी सकाळी साडेआठ वाजता गांधी मैदान येथून ग्रंथदिंडीने या महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. जि. प. मैदानावरील विंदा करंदीकर नगरीत महोत्सवाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता ज्येष्ठ साहित्यिक विजय कुवळेकर, खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. याच दिवशी दुपारी 3 वाजता जपूया देणं निसर्गाचंफ हा कार्यक्रम होणार असून यामध्ये सातार्याची परसबाग-पुष्पपठार कास, उदय गायकवाड हे जलसाक्षर होवूया, मकरंद शेंडे कृष्णा नदी स्वच्छता-एक प्रयत्न यांचा सहभाग आहे.
सायंकाळी 8 वाजता स्वरनिनाद प्रस्तुत बरसात सप्तसुरांचीहा अवीट गोडीच्या नव्या व जुन्या मराठी, हिंदी गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवार दि. 6 रोजी सकाळी साडेआठ वाजता चला घडूयाफ हा साहित्यिक डॉ. इंद्रजित देशमुख यांचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 11 वाजता संशोधकांच्या सहवासातफ या कार्यक्रमात साहित्यिक सागर देशपांडे यांचा सहभाग असेल. दुपारी 3 ते 5 यावेळी साहित्य आणि अनुबंधफ या विषयावर परिसंवाद होणार असून या परिसंवादात डॉ. कांताताई नलावडे, विजय चोरमारे, डॉ. शिवाजीराव देशमुख, प्राचार्य यशवंत पाटणे हे सहभागी होणार आहेत. दरम्यान, सायंकाळी 7 वाजता झी मराठीवरील लोकप्रिय संभाजी मालिकेतील कलाकारांचा सत्कार होणार असून यावेळी मालिकेतील संभाजीमहाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, छोटी येसूबाई आभा बोडस, छोटे संभाजी दिवेश मेदगे, मालिकेचे लेखक व पटकथाकार प्रताप गंगावणे, दिग्दर्शक कार्तिक केंडे, विवेक देशपांडे व इतर कलाकारांचा सत्कार छ. शिवाजीमहाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप कांबळे करणार आहेत.
रविवार दि. 7 रोजी सकाळी 8.30 वाजता विद्यार्थ्यांचा आनंददायी सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून याचे सूत्रसंचालन प्रमोदिनी मंडपे करणार आहेत. सायंकाळी 7 ते 10 यावेळी गेली 30 वर्षे गीतरामायण सादर करणारे नांदेडचे गायक संजय जोशी यांचा गीतरामायण हा कार्यक्रम होणार आहे.
दरम्यानण याचदिवशी दुपारी 3 ते 5 यावेळेत ग्रंथ महोत्सवाचा सांगता समारंभ होणार आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विनय हर्डीकर, संजय आवटी, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांची उपस्थिती आहे.
सोमवार दि. 8 रोजी सकाळी 8.30 ते 10.30 यावेळेत कथाकथन होणार असून यामध्ये राजीव तांबे प्रमुख वक्ते आहेत. तर सुरभि निकम, गौरव कदम, आयेशा शेख, नेत्रा सावंत, निशा सावंत, सायली जोंधळे, काजल सावंत, अक्षदा गुजर, श्रावणी गावकर यांचा सहभाग आहे. सूत्रसंचालन सुनीता कदम करणार आहेत. सकाळी 11.30 ते 1.30 इथे घडतात वाचक वक्तेफ हा कार्यक्रम होणार असून यामध्ये प्रमुख वक्ते राजन लाखे व वि. दा. पिंगळे हे सहभागी होणार आहेत. सूत्रसंचालन नंदा जाधव करणार आहेत. दुपारी 3 ते 5 यावेळेत कवीसंमेलन होणार असून ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती आहे. निमंत्रित कवींमध्ये देवा झिंजाड, लक्ष्मीकांत राजंणे, मृणाल घाटे, सौ. अंजली रसाळ-ढमाळ यांच्यासह नवोदित कवी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र माने करणार आहेत. सायंकाळी 5.30 ते 8 यावेळेत कविता करंदीकरांची, गाणी पाडगावकरांची हा कार्यक्रम होणार असून यामध्ये कवी अरुण म्हात्रे, गायिका अनुजा वर्तक, अभिनेता आदिश पायगुडे यांचा सहभाग आहे. निवेदन आसावरी जोशी करणार आहेत. सूत्रसंचालन वि. ना. लांडगे करणार आहेत.