कराड ः भाजप सरकारने जाणीवपूर्वक शेतमाल आयात-निर्यातीचे धोरण चुकवल्यामुळे त्याचा भुर्दंड शेतकऱयांना सोसावा लागत आहे. देशात साखरेचे अपेक्षीत उत्पन्न असताना मोदी सरकारने पाकिस्तानची साखर आयात केली. त्यातच आतंरराष्ट्रीय पातळीवरील अर्थिक धोरणांमध्ये देशाची पत कमी झाली आहे. उत्पादकांपेक्षा ग्राहकांना जपण्याचे धोरण घेवून देश व राज्यातील सरकार चालले आहे. उद्योगपती कर्जे बुडवून पळून गेली आहेत. या सर्वाचा फटका शेतकऱयांना अधिक बसला आहे. त्याचबरोबर हे सरकार शेतकऱयांचा अर्थिक कणा असलेल्या सहकार क्षेत्रावर असंतुष्ठ आहे. असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. गोंदी (ता. कराड) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन आ. चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्याआधी आ. चव्हाण यांचे फटाक्यांच्या आतषबाजीने जोरदार स्वागत झाले. कार्यक्रमास भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, नितीन पाटील, दिपक पाटील, सरपंच जयाताई मदने, माजी उपसरपंच विलासराव पवार, भगवानराव पवार, मारुती मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. चव्हाण म्हणाले, गोंदीमध्ये अजूनही काही विकासकामे अपेक्षीत आहेत.
ती कामे करण्याचा माझा प्रयत्न राहील. सध्या ऊस उत्पादक व दुध उत्पादक शेतकऱयांचे खूप हाल चालले आहेत. केंद्र सरकारने साखरेची आयात केल्यामुळे हा उद्योगही अडचणीत आला आहे. साखर कारखान्यांना शेतकऱयांना एफआरपी पूर्णपणे देता येईल की नाही याबाबत शंका आहे. दुधाच्या बाबतीतदेखील हीच परिस्थिती आहे. यामधून नकळत सहकार क्षेत्रावर असंतुष्ठ राहण्याचे सरकारचे धोरण आहे. ते म्हणाले, कर्जबुडव्या उद्योगपतींना हे सरकार आश्रय देत आहे. बुडलेल्या कर्जाचा भुर्दंड जनतेकडून वसुल केला जात आहे. सर्वात मोठे भ्रष्ट सरकार आहे. त्यांच्याविरोधात कर्नाटकामध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र आले. हळूहळू हेच बदलाचे वारे देशभर पसरेल. 2014 च्या लोकसभा निवडणूकीत जनतेने मोदींच्याविरोधात मतदान केलेली आकडेवारी जास्त आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी विरोधी पक्षांची मतविभागणी झाल्याचा फायदा मोदींना झाला. परंतु मोदींच्या एकाधिकारशाहीला जनता आता कंटाळली आहे. दिपक पाटील यांचे भाषण झाले.
रमेश पवार, पैलवान भरत पवार, रणधीर पवार, उदय पवार, डॉ. संग्राम पवार, संभाजी पवार, खंडेराव पाटील, विक्रम माने यांनी स्वागत केले. कार्यक्रमानंतर निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पवार यांच्या निवासस्थानी आ. चव्हाण यांनी भेट देवून पवार कुटूंबियांचा सत्कार स्वीकारला.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यातील सरकार पक्ष्चिम महाराष्ट्राच्या विकासनिधीला जाणूनबुजून कात्री लावत आहे. आम्हाला सभागृहामध्ये भाजपचे नेते पक्ष्चिम महाराष्ट्रात खूप विकास झाल्याचे सांगतात. व जास्तीत जास्त विकासनिधी विदर्भासह मराठवाड्याकडे वळवला जात आहे. काँग्रेसच्या आघाडी सरकारने धाकटा किंवा सावत्रपणाची कोणतीही भावना न राखता पक्ष्चिम महाराष्ट्राप्रमाणे उर्वरित महाराष्ट्राचा विकास साधला. पण राज्यातील भाजप सरकार विकासाबरोबर पक्ष्चिम महाराष्ट्रातील शेतकऱयांना वीजेचे कनेक्शन देण्यामध्येही दुजाभाव करत आहे. नागपूराकडे 48 तासात शेतीसाठी नवीन वीजकनेक्शन मिळते, मात्र पक्ष्चिम महाराष्ट्रात वर्षाहून अधिक काळ उलटून गेला, तरी नवीन वीजजोडणी केली जात नाही.