Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीबचत गट फेडरेशनने सुरु केलेली चळवळ महिलांना सक्षम करेल : सौ. वेदांतिकाराजे 

बचत गट फेडरेशनने सुरु केलेली चळवळ महिलांना सक्षम करेल : सौ. वेदांतिकाराजे 

सातारा: आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. महिला जरी शिक्षित असल्या तरी त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतीलच असे नाही. ग्रामीण भागातील गोर- गरीब महिलांना तर रोजंदारीवर उपजिविका चालवावी लागते. गोर- गरीब महिलांना आर्थिक सबल होण्यासाठी महिला बचतगट हा एकमेव पर्याय आहे. या बचतगटांच्या मालासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी बचतगट फेडरेशन कटीबध्द असून फेडरेशनने बचतगटांसाठी सुरु केलेली चळवळ महिलांना खर्‍या अर्थाने सक्षम करेल, असे प्रतिपादन राजमाता श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले बहुउद्देशीर स्वयं. महिला बचत गट फेडरेशनच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
राजमाता श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले बहुउद्देशीर स्वयं. महिला बचत गट फेडरेशनच्यावतीने पुष्कर मंगल कार्यालय येथे मकरसंक्रांती निमीत्त महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि मालाच्या विक्रीसाठी दि. 10 ते 13 या कालावधीत प्रदर्शन भरवण्यात आले असून या प्रदर्शनाचे उदघाटन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी जावली पंचायत समितीच्या सदस्या सौ. जयश्री गिरी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. स्नेहलता जाधव, विमल शिंगरे, लिना माने, सुजाता घोरपडे, शैलजा किर्दत, नीना जाधव, स्मिता भोसले, लतिका येवले, उषा खूडे यांच्यासह फेडरेशनच्या सदस्या उपस्थित होत्या.
सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या, प्रत्येक महिलेच्या हाताला काम आणि केलेल्या कामाला दाम मिळाले तरच बचत गट चळवळीचा उद्देश सफल होणार आहे. आज प्रत्येक घरातील मुलगी, महिला सुशिक्षित आहे. परंतू कौटुंबीक अडचणीमुळे सर्वांनाच नोकरी करणे शक्य नसते. त्यामुळे शहरी आणि विशेषत: ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या शिक्षणाचा फायदा स्वत:च्या सबलीकरणासाठी केला पाहिजे. त्यासाठी महिलांनी एकत्र येवून बचतगट स्थापन केले पाहिजेत. या गटांच्यामाध्यमातून विविध वस्तूनिर्मीती करुन त्याद्वारे आर्थिक सक्षमीकरण केले पाहिजे. अशा महिला बचत गटांसाठी राजमाता श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले बहुउद्देशीर स्वयं. महिला बचत गट फेडरेशनमार्फत हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जात आहे. त्याच उद्देशाने दि. 10 ते 13 या कालावधीत पुष्कर मंगल कार्यालय येथे फेडरेशनमार्फत प्रदर्शन भरवण्यात आले असून या प्रदर्शनात 32 स्टॉल्स लागले आहेत.
त्यामुळे या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून देशात कोणत्याही शहरात होणार्‍या प्रदर्शनात फेडरेशनमार्फत जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची खात्रीशीर विक्री केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला बचत गटांनी फेडरेशनच्या या चळवळीत सहभागी होवून महिला सबलीकरणाला साथ द्यावी, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले.
या प्रदर्शनात 32 स्टॉल्स असून यामध्ये दिव्यांग गटाचाही एक स्टॉल आहे. तसेच कर्तव्य बचत बजार आणि इतर सर्वच स्टॉल्सवर महिलांनी स्वत: बनवलेल्या कुरडई, तांदळाचे पापड, सेंद्रीय गुळ, आवळा कॅण्डी, भाजणी पिठ, बाजरीचे पीठ, संक्रांतीचे वाण यासह विविध खाद्य पदार्थांची रेलचेल असून खरेदीसाठी गर्दी होत आहे. दरम्यान, दि. 17 ते 29 जानेवारी या कालावधीत कुर्ला, मुंबई येथे होणार्‍या महालक्ष्मी सरस या प्रदर्शनात नाबार्डच्या सहकार्याने बचतगट फेडरेशनचा स्टॉल सहभागी होणार असून याद्वारे सातार्‍यातील महिला बचतगटांचा माल आणि बस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular