सातारा : प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीने अल्पावधीत उभारी घेतली. 12 हजार चात्यांवर सूत उत्पादन घेणार्या अजिंक्यतारा सूत गिरणीत येत्या मार्च अखेर 14 हजार चात्यांवर सूत उत्पादन केले जाणार आहे. आजच्या काळात सूत गिरण्यांपुढे अनंत अडचणी आहेत. मात्र प्रत्येक अडचणीवर मात करुन अजिंक्यतारा सूत गिरणीने मोठी घोडदौड सुरु ठेवली आहे. सहकारी सूत गिरणी क्षेत्रात अजिंक्यातारा सूत गिरणीचे कार्य नक्कीच आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी काढले.
वळसे येथील अजिंक्यतारा सूत गिरणीस दिलेल्या भेटीप्रसंगी पाटणे बोलत होते. यावेळी गिरणीचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन रामचंद्र जगताप, व्हा. चेअरमन हणमंत देवरे, वस्त्रोद्योग विभागाचे सहसचिव बी.बी. चव्हाण, उपसचिव डी.ए. कुलकर्णी, सोलापूर प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक किरण सोनावणे, वस्त्रोद्योग महासंघाचे सचिव संभाजी देसाई यांच्यासह संचालक आणि अधिकारी उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सूत गिरणी संचालक मंडळाच्यावतीने प्रधान सचिव पाटणे यांचे स्वागत करुन सत्कार केला. तसेच गिरणीची सद्य परिस्थिती आणि सूत उद्योगासमोरील अडचणी विशद केल्या. 12 हजार चात्यांवर सुरु असलेल्या अजिंक्यतारा सूत गिरणीस एनसीडीसी नवी दिल्ली या संस्थेकडून नुकतेच मध्यम मुदत कर्ज मंजूर झाले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील 14 हजार चात्यांचा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी मशिनरी त्यामध्ये 4 कार्ड, 1 र्ड्रा फ्रेम, 1 लॅप फॉर्मर, 3 कोंबर्स, 1 स्पिड फ्रेम, 2 रिंग फ्रेम, 1 अॅटो कोनर, 5 स्लब व 5 कॉम्पॅक्ट आदी मशिनरी येत्या मार्च 2018 अखेर गिरणीवर येत असून गिरणीचा पहिला टप्पा पुर्ण होत आहे. त्यामुळे गिरणीच्या उत्पादनात आणि रोजगारात वाढ होणार असून उत्कृष्ट दर्जाचे सूत कोंबड यार्न, कार्डेड यार्न तसेच फॅन्सी यार्न मध्ये स्लब यार्न, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असणारे स्पेशल कॉम्पॅक्ट यार्न अशा विविध यार्नची निर्मीती करणे नवीन मशिनरीमुळे शक्य होणार आहे. आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत सूत निर्यात करुन व स्थानिक बाजारपेठेत सूतास उत्कृष्ठ क्वॉलिटीच्या सूत निर्मीतीमुळे सूताला चांगला दर मिळेल आणि सूत गिरणीच्या नफ्यात वाढ होईल, असा विश्वास आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच महाराष्ट्र शासनाने वीज बिलात प्रती युनिट 3 रुपये सवलत दिल्याने सूत गिरणींचा लाईट बिलावरील खर्च कमी होणार आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग व्यवसायाची अडचणीत चालणारी वाटचाल थोड्याप्रमाणात थांबल्याचेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
यावेळी गिरणीचे संचालक विष्णू सावंत, लक्ष्मण कदम, सुरेश टिळेकर, जगन्नाथ किर्दत, गणपतराव मोहिते, बळिराम देशमुख, रघुनाथ जाधव, उत्तमराव नावडकर, कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी, चीफ अकौंटंट मानसिंग पवार, मिल इंजिनियर प्रदीप राणे, प्रॉडक्शन मॅनेजर शैलेश जानकर आदी मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.
अजिंक्यातारा सूत गिरणीचे कार्य आदर्शवत ; वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांचे गौरवोद्गार
RELATED ARTICLES