औंध : येथील मूळपीठ डोंगरावरील लूटमार करणार्या तीन संशयित आरोपींना बुधवारी वडूज येथील न्यायालयासमोर हजर केले असता कोर्टाने तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबतची अधिक माहिती अशी सोमवारी सायंकाळी एक प्रेमी युगल मूळपीठ डोंगरावर फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी हे युगल बनबुवा मंदिरानजीक बसले असता बाळू गिरिजाप्पा जाधव,विशाल अशोक मदने ,विशाल पाटोळे त्याठिकाणी गेले व त्यांनी त्या युगलास दांडक्याने मारहाण करून रोख अडीच हजार रूपये व बावीस हजार रुपयांचा मोबाईल असा सुमारे पंचवीस हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर पोलीस हवालदार प्रशांत पाटील यांच्या जवळ असणार्या संशयीत आरोपीचा फोटो प्रेमी युगुलाने ओळखल्या नंतर अवघ्या बारा तासात औंध पोलीसांनी सपोनि सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन संशयीतांना महिमानगड येथून सापळा लावून अटक केली तर एका आरोपीस औंध येथून ताब्यात घेतले.
तीनही संशयितांना बुधवारी वडूज कोर्टाने पाच दिवस पोलीस कोठडी दिली आहे. त्यामुळे याटोळीकडून अजून किती गुन्हे उघड होणार याचे गूढ निर्माण झाले आहे. पोलीस त्यादिशेने अधिक तपास करीत आहेत.