पाटण :- आबदारवाडी (ता. पाटण) येथील पेट्रोल पंपासमोर वीट वाहतूक करणाऱ्या ट्रकने मोटर सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सई सचिन कोळी (रा. पाटण वय 3) ही चिमुरडी मुलगी जागेवरचं ठार झाल्याची घटना बुधवार दि. 13 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताची फिर्याद सुनिल पांडूरंग कोळी यांनी मल्हारपेठ पोलिसात दिली आहे. दरम्यान अपघातस्थळावरील नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटुन टाकणारा होता.
सई सचिन कोळी ही 3 वर्षीय चिमुरडी आपली आई सायली सचिन कोळी हिच्यासोबत मामाच्या गावाला आबदारवाडी, ता. पाटण येथे गेली होती. बुधवार दि 13 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मनोज देसाई (वय 25), सोनाली सचिन कोळी ( रा. पाटण 23) आणि कु. सई सचिन कोळी (3) हे तिघेजण दुचाकीवरून मल्हारपेठला कपडे खरेदीसाठी निघाले होते. यावेळी पाटणहून विटाने भरलेला ट्रक (क्र. एम. एच. 11 एम. 5173) कराडच्या दिशेने निघाला असता ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तीन वर्षाची चिमुरडी सई ट्रकखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील सोनाली कोळी यांना उपचारासाठी कराड येथील दवाखान्यात पाठविण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सईचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी निसरे गावच्या यात्रेस सई आपली आई सोनाली कोळी यांच्यासोबत मामाच्या गावी माहेरला आली होती. ती शेजारील मनोज देसाई यांच्यासोबत दुचाकीवरून मल्हारपेठला खरेदीसाठी घरातून निघाल्यास काही अंतरावरच रस्त्यावर अपघात झाला. घरातील सर्वांच्या समोरच हा अपघात झाल्याने नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटुन टाकणारा होता. या अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलिसात झाली असून अधिक तपास संतोष कोळी करत आहेत.