Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीजिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास हजारोंच्या संख्येत प्रचंड प्रतिसाद, प्रदर्शनाचा आ.श्री.छ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत आज...

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास हजारोंच्या संख्येत प्रचंड प्रतिसाद, प्रदर्शनाचा आ.श्री.छ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत आज समारोप

साताराः महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राजयविज्ञान शिक्षण संस्था नागपूर, सातारा जि.प. शिक्षण विभाग व येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमानें सातारा येथील न्यु इंग्लिश स्कूलमध्ये डॉ.सी.व्ही.रमण शास्त्रनगरीत आयोजित केलेल्या 44 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास गेले दोन दिवस उदंड प्रतिसाद लाभत आहे. सातारा शहर परिसरातील शेकडो शाळांतील हजारो मुलामुलींनी उत्साहाने या प्रदर्शनाला भेट देवून नवीन संकल्पना, विज्ञानातील चमत्कार व संशोधन कार्याची ओळख करून घेतली.
जिल्हयातील अकरा तालुक्यातील 66 मुले व मुली व शिक्षक व परिचर यांनी या प्रदर्शनात 121 उपकरणे सादर केली आहेत. न्यु इंग्लिश स्कूलच्या 16 वर्गात मांडलेले हे भव्य प्रदर्शन गुरूवार दि. 10 पर्यंत सर्वासाठी खुले आहे. या प्रदर्शनाचा समारोप सोहळा गुरूवार दि. 10 रोजी दुपारी 2 वा. सातारा जावली तालुक्याचे आ.श्री.छ.शिवेंद्रराजे भोसले, डॉ.अनिल पाटील, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेच्या नियामक मंडळाचे सदस्य अनंत जोशी व सातारा जि.प.चे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतिक कदम, सौ.अनिता चोरगे, सौ.रेश्मा शिंदे, सौ.भाग्यश्री मोहिते, सौ.मधू कांबळे, सौ.अर्चना देशमुख, सौ.कमल जाधव, व मनोज घोरपडे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान गुरूवारी सकाळी या विज्ञान प्रदर्शनात आपले पर्यावरण या विषयावर डॉ.सुधीर कुंभार व दुपारी 12 वा. कासवांची बेटे या विषयावर डॉ.संदीप श्रोत्री यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
उदघाटन सोहळयानंतर मागील दोन दिवसात या प्रदर्शनात विज्ञानाशी निगडीत विविध उपक्रम संपन्न झाले. यामध्ये कैलास बागल यांचे सापांची ओळख या विषयावर अतिशय विस्तृत व माहितीपूर्ण स्लाईड शोसह व्याख्यान संपन्न झाले. राम सुर्यवंशी सरांचे विज्ञानातील चमत्कार प्रयोग अनुभवताना उपस्थित मुलामुलींना दोन तासांत शेकडो प्रयोग दाखवून अचंबित करण्यात आले. पहिल्या दिवशीची सांगता शहरातील हिंदवी स्कूल, अनंत इंग्लिश स्कूल, भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय व यशोदा स्कूलच्या वतीने सादर केलेल्या विविध सामुहिक नृत्याने झाली. बुधवारी सकाळी या प्रदर्शनात ई कचरा निर्मुलन कसे कराल या विषयीची विस्तृत माहिती आपल्या व्याख्यानातून ज्येष्ठ पर्यावरणवादी डॉ.सौ. संध्या चौगुले यांनी दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय समितीचे सदस्य सारंग कोल्हापूरे उपस्थित होते. त्यानंतर प्राथमिक व माध्यमिक वर्गातील मुलामुलींसाठी विज्ञानावर आधारित प्रश्‍नमंजुषा स्पर्धा संपन्न झाली त्यानंतर संभाजी पाटील यांचे व्यवसाय मार्गदर्शन या विषयावर तर किशोर काळोखे यांचे व्यसनाधिनता कशी टाळावी या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. बुधवारची संध्याकाळ कन्याशाळा व न्यू इंग्लिश स्कूलच्या शालेय विद्यार्थ्यानी सादर केलेल्या सुरेख गीतगायनाने अधिकच रंगत गेली.
या प्रदर्शनात शालेय मुलामुलींनी साकारलेले प्रयोग व उपकरणांमध्ये सोलर ऊर्जेपासून मदत घेत बनविलेला स्प्रिंग कुलर, पाणीविरहित दुर्गंधीमुक्त युरीनल प्लांट यासोबत वाहतूक समस्येवरील उपाय, एअर फिल्टर, एटीएम लॉकर मशिन, हॅन्ड जनरेटर, विद्युत ऊर्जेचे चुंबकीय ऊर्जेत रूपांतर, कमी जागेत जादा वाहनांचे पाकिर्ंग, अल्प पाण्यावर परसबाग आदी प्रयोग विशेष आकर्षण ठरत आहेत. याशिवाय ऑर्गेनिक फिल्टर, विद्युत ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत म्हणजे एलईडीत रूपांतर, लाकूड कटर, अंधासाठी विशेष उपयोगी पांढरी काठी, हवाशुध्दीकरण यंत्र असे प्रयोगही विशेष आकर्षण आहेत.
दरम्यान, विज्ञान प्रदर्शनात रेखाटलेल्या भव्य व सुरेख रांगोळया शाळेच्या सौ.रूपाली हराळे व सौ.सोनाली महाडीक यांनी विद्यार्थीनीच्या साह्याने अतिशय आकर्षकरित्या व अनोख्या पध्दतीने काढल्याबद्दल अनेकांनी त्यांची प्रशंसा केली. विज्ञान प्रदर्शनात मांडलेल्या उपकरणांचे परिक्षण डॉ. विश्‍वास देशपांडे, प्रा.प्रदीप यादव व श्री जांभळे सर यांनी केले. या प्रदर्शनात बक्षीसपात्र उपकरणांची निवड आता राज्यपातळीवर होणार्‍या विज्ञान प्रदर्शनात केली गेली आहे. हे प्रदर्शन गुरूवार दुपारपर्यत सर्वासाठी खुले असून त्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन शालाप्रमुख सौ.स्नेहल कुलकर्णी यांनी केले आहे.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular