सातारा दि. १८ – विशाळगड व पायथ्याच्या गजापूर येथे झालेल्या हिंसाचाराबाबत सविस्तर न्यायालयीन चौकशी व्हावी , या पाठीमागे असलेल्या मुस्लीम विरोधी षडयंत्राचा शोध घेण्यात यावा , यामध्ये नुकसान झालेल्या रहिवाशांना तातडीने संरक्षण मिळावे. सविस्तर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी . या सर्व हिंसाचाराला उद्युक्त करणारे कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे , संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी या व इतर मागण्यांचे निवेदन आज सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांना परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीने देण्यात आले.
सातारचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना शिष्टमंडळाने भेटून त्यांना हे निवेदन दिले.
शिष्टमंडळामध्ये ऍड वसंतराव नलावडे , ऍड दिलावर मोदी , विजय मांडके , मिनाज सय्यद , प्रमोद परामणे , विजय निकम , सलीम आतार , जमीर शेख , मोहसीन शेख ,गफुर सय्यद, अस्लम तडसरकर , मुन्वर कलाल आदींचा समावेश होता.
निवेदनात म्हटले आहे की कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांनी स्वतः दिलेल्या माहितीनुसार एका विशिष्ट समाजाच्या घरांवर दगडफेक व तोडफोड करण्यात आली. मुस्लिमांना लक्ष करण्यात आले आहे. अतिक्रमण हटवणे ही जबाबदारी प्रशासनाची असताना व त्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना अशा पद्धतीने हिंसकरीत्या धर्माची साद घातली गेली. अतिक्रमण हटवण्याचा नारा देणे आणि त्यासाठी आंदोलन आयोजित केले होते.हिंसाचार भडकवणे यामागे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ध्रुवीकरण करण्यासाठी केलेले हे धार्मिक राजकारण आहे.
विशाळगड व गजापूर येथील झालेल्या हिंसाचारात ज्यांचे नुकसान झाले आहे. अशा व्यावसायिकांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे . त्यांच्या रोजगाराची सोय करण्यात यावी. सातारा जिल्ह्यामध्ये देखील अशा हिंदू – मुस्लिम संयुक्त धार्मिक परंपरा असणाऱ्या दर्ग्यांच्या बाबतीत वेगवेगळे वाद निर्माण केले जात आहेत. त्याविषयी वेळीच खबरदारी घेतली पाहिजे. विशाळगड सारख्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये. म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन हे प्रश्न वेळीच सोडवले पाहिजेत. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर पुढाकार घेतला जावा. अशी ही मागणी करण्यात आली आहे……………………………… फोटो -सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात परिवर्तनवादी व पुरोगामी संघटनेच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदन देताना (छाया-निनाद जगताप, सातारा)