वाई: गेल्या अनेक वर्षा पासून वाई तालुक्यातील हळद उत्पादक शेतकरी सोन्याच्या किमतीचे हळदीचे पिक घेत असताना सुध्दा कायम कर्ज बाजारी होताना दिसत आहे, हळद पिकाला शासनाकडून हमी भाव मिळत नसल्याने शेतकर्यांची परवड थांबत नाही. बाजार समितीने पोसलेले व्यापारी हेच हळदीचा भाव ठरवीत असल्याने त्यांच्याकडून हळद उत्पादक शेतकर्यांची पिळवणूक होताना दिसत आहे. त्यातच तालुक्यातील शेतकरी व्यापारयांकडून हवे तेव्हा पैसे उचलत असल्याने व्यापार्यांची मनमानी चालू असते. गेल्या पाच वर्षात एकाही वर्ष दहा हजारांच्या वरती हळदीला भाव मिळाला नाही. यावर्षी वाई बाजार समितीने 8600 रुपयांचा भाव हा उत्तम प्रतीच्या माला जाहीर केला असल्याने सात हजारातच सर्वसामान्य मालाला पैसे मिळणार हे निश्चित! उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च वाढत असल्याने म्हशीपेक्षा रेडकू जड अशी काहीशी अवस्था तालुक्यातील सोन्याचे पिक घेणार्या शेतकर्यांची झाली आहे. हे पिक स्पर्धात्मक असल्यानेच शेतकर्यांचा कल या पिकाकडे आहे. तसेच या पिकाचा बिवड हा दुसर्या घेणार्या पिकासाठी उत्तम प्रतीचा होत असल्यानेच हळदीचे उत्पन्न घेताना शेतकरी दिसत आहे. वाई तालुक्यात शहाबाग, खानापूर, ओझर्डे, पांडे, जोशिविहीर, बावधन, मेणवली, धोम या गावांमधून हळदीचे पिक मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे.
गेल्या पाच वर्षातील हळदीच्या भावाची रूपरेषा:- सन 2013-14 मध्ये हळदीला कमीतकमी- सहा हजार, जास्तीत-जास्त- आकरा हजार, तर सरासरी भाव हा आठ हजार पाचशे इतका मिळाला, 2014-15 साली-सहा हजार, बारा हजार, व नऊ हजार इतका मिळाला होता. 2015-16 साली- सात हजार, बारा हजार, नऊ हजार पाचशे, मिळाला, 2016-17 साली आठ हजार, दहा हजार, व नऊ हजार मिळाला, 2017-18 साली- पाच हजार, नऊ हजार, व आठ हजार मिळाला, नुकताच जाहीर झालेला भाव हा सात हजार, आठ हजार सहाशे व सरासरी पाच हजार पाचशे पर्यंत मिळेल. एकंदर हळदीचा भाव अनियमित दिसून येत आहे.
एकरी येणारा खर्च- शेणखत एक ट्रॉली सहा हजार रुपये प्रमाणे पाच ट्रॉली शेणखतासाठी तीस हजार मोजावे लागतात. दहा महिन्यांचे पिक असल्याने 19 रोटेशन पाणी द्यावी लागतात. तीन हजारा प्रमाणे पन्नास हजार रुपये फक्त पाण्यासाठी खर्च करावा लागतो, पाणी भाड्याने घ्यावे लागल्यास दोनशे रुपये तासांनी पाणी विकत घ्यावे लागते. मजुरी महिलांसाठी दोनशे रुपये तर पुरुषांसाठी चारशे रुपये मोजावे लागतात. एक एकर हळद काढणीसाठी तीन दिवस लागत असून प्रत्येक दिवशी दहा पुरुष व तीस महिला काम करतात. पंधरा हजार काढणीसाठी तर पाच हजार पाला काढण्यासाठी खर्च करावा लागतो, रासायनिक खतांसाठी वीस हजार रुपये मिजावे लागतात. बियाणे पंधरा हजार रुपये, मशागत करण्यासाठी दहा हजार रुपये खर्च येतो. शिजविण्यासाठी क्विंटलला तीनशे पन्नास रुपये तर पॉलीशला दहा हजार खर्च करावा लागतो. यामध्ये शेतकर्यांच्या कष्टाचा विचार केलेला नाही. जवळपास दीड लाख रुपयांचा खर्च एकरी करावा लागतो उत्पन्न मात्र एकरी एक लाख साठ ते सत्तर हजार मिळतात. फक्त हमाली करून घेणारे हळदीचे पिक असून सोन्याच्या पिकाची सध्या तरी हमी भाव मिळत नसल्याने शेतकर्यांची परवड होताना दिसत आहे.
शेताचा बिवड चांगला तयार होतो व अंतर्गत पिक घेता येत असल्याने वाई तालुक्यातील शेतकरी हळद उत्पादन घेताना दिसत आहे. हळदी मध्ये- मिरची, गवार, काकडी, भेंडी ही नगदी पिके घेण्यात येतात. तसेच हळद निघाल्यानंतर दुसरे पिक चांगल्या प्रतीचे घेता येते.
प्रत्येक बाजार समितीमध्ये शीत गृहाची व्यवस्था असावी. काही वेळेस हळदीच्या पिकाला भाव योग्य मिळत नाही अशा वेळी शेतकर्यांचा माल शीतगृहात ठेवल्यास त्याची प्रतवारी कमी न होता मालाला चांगला भाव मिळेल त्यातून कररूपी बाजार सामितीचाही फायदा होवू शकतो, तसेच शासनाने शेतकर्यांकडून संपूर्ण माल विकत घेवून तो व्यापार्यांना होसेल दारात दिल्यास शेतकरी व बाजार समिती यामधील व्यापारी बाजूला जावून दलाली कमी होवून शेतकर्यांसह शासनाचाही फायदा चांगला होवू शकतो. तसेच बाजार समितीवरील व्यापार्यांची मक्तेदारी मोडून निघेल व शेतकर्यांची होणारी कुचंबना बंद होईल.
वाई तालुक्यातील हळद उत्पादक शेतकर्यांची अवस्था, म्हशी पेक्षा रेडकू जड
RELATED ARTICLES

