सातारा : सातारा वाढीव पाणी पुरवठा (उरमोडी नदी उद्भव) या योजनेतून शहराच्या 50% भागास पाणी पुरवठा केला जातो. या योजनेच्या माध्यमातून घोरपडे टाकी, गणेश टाकी, बुधवार नाका टाकी, नागझरी टाकी क्रं. 1, 2, 3, 4 या टाकंना तसेच शाहु गार्डन टाकी व यशवंत टाकी राजवाडा टाकी या टाक्यांना पाणी पुरवठा करुन शहराच्या विविध भागामध्ये पाणी वितरण केले जाते. या योजनेला उरमोडी धरणाचे पाणी उरमोडी नदीतून उपळी के. टी. वेअर जवळ बांधणेत आलेल्या पंपींग स्टेशन रॉ वॉटर उपसा करुन सदरचे पाणी जकातवाडी येथील फिल्ट्रेशन प्लॅन्ट येथे शुध्द करुन सदरचे पाणी बोगदा येथील खाणीजवळ टाकीमध्ये साठवण करुन विविध टाक्यांना पाणी वितरण केले जाते.
उरमोडी धरणातून सोडलेले पाणी उपळी के. टी. वेअर येथे अडविणेसाठी सध्या न. पा. मार्फत लाकडी फळ्या बसविण्यात येतात तथापि दरवर्षी लाकडी फळ्यांना डांबर लावणे, पावसाळ्याच्या सुरुवातीस फळ्या काढणे, पावसाळा संपलेनंतर फळ्या बसविणे तसेच के. टी. वेअरला लाकडी फळ्या बसविता के. टी. वेअरच्या दोन्ही बाजूमध्ये माती भरावी लागते. तसेच लाकडी फळ्या बाहेर काढलेनंतर विविध कारणांमुळे चोरीस जाणे, सतत लाकडी फळ्या पाण्यात राहिलेमुळे कुजण्यासारखे प्रकार होतात. या कामासाठी दरवर्षी अंदाजे 4 लाख रुपये खर्च पालिकेला येत होता. मात्र आता यापुढे खर्च येणार नाही. त्यामुळे दरवर्षी सुमारे 4 लाख रुपयांची बचत होणार आहे.
लाकडी फळ्या मागील वर्षी बसविण्यात आलेल्या आहेत पण सदर फळ्या कमी उंचीच्या असलेमुळे जलसंपदा विभागामधून सोडले जाणारे पाणी 200 क्युसेक पाणी पुढे वाहून जात आहे. तथापि जलसंपदा विभागाकडून डॅममधून पाणी 200 क्युसेक सोडणेत येईल त्यामुळे सदरचे पाणी दोन महिना पुरेल अशी साठवण करुन ठेवणेबाबत जलसंपदा विभागाकडून पत्राद्वारे कळविले आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केलेल्या सूचनेनुसार शहापूर उफळी के. टी. वेअर येथे लोखंडी निडेल्स (फळ्या) बसविल्यास खर्चाची बचत होणार आहे व सातारा शहराला मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. यासाठी नगरपरिषदेचे पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी पाठपुरावा केला. या कामासाठी 15 लाख रु. रकमेचा धनादेश पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता क्षीरसागर यांचेकडे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे हस्ते सुपूर्द करणेत आला.
यावेळी नगरपरिषदेचे नगराध्यक्षा सौ. माधवी संजोग कदम, उपनगराध्यक्षा सुहास राजेशिर्के, पाणी पुरवठ सभापती श्रीकांत आंबेकर, अमर आवळे नगरपरिषदेचे सावंत तसेच राम हादगे हे उपस्थित होते.