औंध: लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या औंध येथील श्री यमाईदेवीचा वार्षिक रथोत्सव आई उदे ग अंबे उदेच्या जयघोषात अपूर्व उत्साहात लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.
ऐतिहासिक व शंभर वर्षाहुन अधिक वर्षाची परंपरा लाभलेल्या औंधच्या श्रीयमाईदेवी रथोत्सवास दुपारी बारा वाजता प्रारंभ झाला. त्याअगोदर माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार व श्रीयमाई देवस्थानच्या चीफ ट्रस्टी श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते ग्रामनिवासिनी श्रीयमाई देवी मंदिरामध्ये श्रीयमाईदेवीच्या उत्सवमूर्तीचे विधीवतपणे षोडषोपचारे पूजन करण्यात आले. देवीची उत्थापना करून त्यानंतर देवीची उत्सवमूर्ती सभामंडपात आणण्यात आली.
यावेळी राजकन्या श्रीमंत हर्षिताराजे पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते देवीच्या उत्सवमूर्तीचे विधिवतपणे पूजन करण्यात आले. यावेळी गणेश इंगळे, नंदकुमार जोशी, अनिकेत इंगळे, यांनी पौरोहित्य व मंत्रपठन केले. यावेळी दुध, दही, पुष्प अर्पण करून देवीची पूजा करण्यात आली.त्यानंतर देवीची चौपाळयाजवळ प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्याठिकाणी मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते विधीवतपणे देवीचे पूजन करण्यात आले.त्यानंतर येथील ऐतिहासिक परंपरेनुसार सलामी देऊन राजकन्या श्रीमंत चारूशीलाराजे पंतप्रतिनिधी यांंच्या हस्ते देवीची पालखीत प्रतिष्ठापना करण्यात आली.त्यानंतर पालखीचे मानकरी भोई यांनी वाद्यव्रूंदाच्या गजरात पालखीची फेरी रथापर्यंत नेली.त्याठिकाणी माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांच्या हस्ते देवीची ऐतिहासिक दुमजली रथात प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी राजकन्या श्रीमंत चारूशीलाराजे,श्रीमंत हर्षिताराजे, प्रभाकर घार्गे,प्रभाकर देशमुख, प.पू. सुंंदरगिरी महाराज,सुनील माने,शिवाजी सर्वगोड, संदिप मांडवे,सी.एम.पाटील, धैर्यशील कदम, सुरेंद्र गुदगे,सतीश फडतरे, हणमंत शिंदे,राजेंद्र माने,आब्बास आतार, रमेश जगदाळे, इलियाज पटवेकरी, सरपंच नंदिनी इंगळे,सचिन शिंदे, सोनाली खैरमोडे, प्रशांत खैरमोडे,नवल थोरात,
चंद्रकांत पाटील,मनोज पोळ ,शंकरराव खैरमोडे आदी प्रमुख उपस्थित होते.
त्यानंतर श्रीयमाईदेवीच्या रथोत्सवास उत्साही मंगलमय वातावरणात सुरूवात झाली.यावेळी रथाचे मानकरी माळी,भाविक,ग्रामस्थ यांनी रथ ओढून मिरवणूकीस प्रारंभ केला.यावेळी राज्यासह परराज्यातून आलेल्या भाविकांनी श्रीयमाई देवीचे दर्शन घेऊन रथावर एक रूपयांपासून ते दहा हजार रूपयांपर्यंतच्या नोटा ,नारळाची तोरणे ,फुलांच्या माळा ,गुलाल खोबरे अर्पण केले व आई उदे ग अंबे उदेचा जयघोष केला.
दुपारी बारा वाजता निघालेली रथ मिरवणूक पेठगल्ली, होळीचा टेक, ग्रामसचिवालय मार्गे, येथील पद्माळे तळयावर नेण्यात आला .त्याठिकाणी तळयामध्ये देवीच्या उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले.त्यानंतर मोकळाई देवीच्या भेटीनंतर सायंकाळी सात वाजता रथाची फेरी राजवाडा पटांगणावर आणण्यात आली. त्यानंतर उत्सवमूर्तीची मूळस्थानी प्रतिष्ठापना करण्यात आली.