Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीयेरळवाडी तलावात फ्लेमिंगोचे आगमन

येरळवाडी तलावात फ्लेमिंगोचे आगमन

सातारा : खटाव तालुक्यातील येरळवाडी येथील मध्यम प्रकल्पावर वाढत्या थंडीमुळे स्थलांतरित प्लेमिंगो पाहुणे पक्षी मुक्कामास आल्याने किलबिलाट वाढला आहे. पक्षाचे आगमन एक महिना उशिरा झाले आहे. मायणी येथील इंदिरा गांधी पक्षी अभयारण्यात पक्षाचे वास्तव्य असायचे पण तीन ते चार वर्ष पक्षी तेथे न येता येरळवाडी तलावात येऊ लागले आहेत. तसेच तलाव परिसरात पक्ष्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. सकाळी व सायंकाळी या पाहुण्यांचे निरीक्षण करण्यासाठी पक्षीप्रेमींची पावले येरळा तलावाकडे वळू लागली आहेत.
येरळवाडी मध्यम प्रकल्पात अनेक स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. यामध्ये सुमारे 40 ते 50 फ्लेमिंगो पक्षांच्या थव्याचा समावेश आहे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ गोठण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हे परदेशी पाहुणे सैबेरिया, चीन, अफगाणिस्तान, रशिया आदी देशातून भ्रमंती करत राज्याच्या काही भागात येतात. महाराष्ट्रात त्यांचा येण्याचा कालावधी हा डिसेंबरचा पहिला आठवडा असतो. यावेळी त्यांचे आगमन जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात झाले आहे. सध्या तलाव चित्रबलाक, करकोचा, कांडेसर, स्पून बिल, काळा शराटी, पान कावळा, खंड्या, कवड्या, कवड्या तुतारी, शेकाट्या, जांभळी पाणकोंबडी, चक्रवाक, नदीसुरय, सुतारपक्षी, ग्रे हेरॉन, चांदवा, कोतवाल आदी पाहुण्यांनी बहरला आहे. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, पुणे आदी ठिकाणांहून पक्षीप्रेमी तलाव परिसरात दाखल होत आहेत. पक्ष्यांच्या हालचाली पाहण्यासाठी सकाळी व सायंकाळी गर्दी होत आहे. दरम्यान, या सर्वांपेक्षा देखणा फ्लेमिंगो (रोहित, अग्निपंख) या परदेशी पाहुण्याची पक्षीप्रेमी वाट पाहत आहेत. गत महिन्यात चार ते पाच फ्लेमिंगो पक्षी वास्तव्यास असल्याचे दिसून आले. शनिवारी सायंकाळी उशिरा 40 ते 50 पक्षांचा थवा येरळवाडी तलावात दाखल झाला. तलावात पाणीसाठा असल्याने या पक्षांना खाद्यासाठी व बसण्यासाठी सुरक्षित जागा मिळाली. तलाव परिसरात दलदलीच्या भागात फ्लेमिंगो पक्षी मासे कीटक, आटोलिया या सारख्या वनस्पतींच्या शोधत मुक्तविहार करताना दिसत आहेत. त्यांच्या आकर्षक छबीचे क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकार व पक्षीप्रेमी तलावाकडे धाव घेत आहेत. दरम्यान, दरवर्षी डिसेंबर महिना अखेर येरळवाडी तलावात फ्लेमिंगो पक्षी येतात. त्यांच्या निरीक्षणासाठी पक्षीप्रेमीही हजेरी लावतात. फ्लेमिंगोंच्या आगमनाने पक्षीप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. खटाव तालुक्यात वाढत्या गुलाबी थंडीबरोबर रंगाने गुलाबी असणार्‍या फ्लेमिंगोच्या (रोहित) आगमनाने पक्षीमित्रांची येरळवाडी तलावाकडे वर्दळ वाढली आहे. खटाव तालुक्यातील येरळवाडी तलाव परिसरात फ्लेमिंगोची मुक्कामाची आवडती ठिकाणे आहेत. या तलावात मुबलक व पुरेशा पाणीसाठ्यासह खाद्य उपलब्ध असल्याने पक्षीमित्रात आनंदाचे वातारणात निर्माण झाले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular