वडूज (धनंजय क्षीरसागर) : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सोडत मंगळवारी होणार आहे. या सोडतीमध्ये अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे राहणार यावर खटाव-माण तालुक्यातील इच्छुक उमेदवार, त्यांचे समर्थक तसेच राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे.
अध्यक्षपद ओ.बी.सी. प्रवर्गासाठी आरक्षीत झाल्यास खटाव तालुक्यात या प्रवर्गातील चार सदस्य आहेत. त्यामध्ये मायणी गटाचे सुरेंद्रदादा गुदगे, खटाव गटातील प्रदिपआण्णा विधाते, पुसेगांव गटाच्या सुनिता कचरे, निमसोड गटातील सौ. कल्पना खाडे यांचा समावेश आहे. यापैकी सुरेंद्रदादा सद्या पक्षप्रतोद म्हणून काम पाहात आहेत. मायणी गट सलग तीनवेळा कायम राखण्याबरोबर सभागृहातील मोस्ट सिनिअर व अभ्यासू सदस्य म्हणून त्यांचा नावलौकीक आहे. माण विधानसभा मतदारसंघाच्या पडझडीच्या पार्श्वभूमीवर अश्या आक्रमक नेतृत्वास पक्षश्रेष्ठींनी संधी दिल्यास त्याचे ते सोने करु शकतात.
दुसरीकडे गुदगे यांच्या तोला-मोलाचेच खटाव गटातील सदस्य प्रदिपआण्णा विधाते हेही एक दमदार नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नावाचा उत्तर खटाव भागात चांगला दबदबा आहे. कोरेगांव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे. तर श्री. विधाते यांच्याच गावातील शिवसेनेचे महेश शिंदे आमदार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय समतोल साधण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी प्रदिप आण्णांच्या नावाचा विचार करणे गरजेचे आहे असे राजकीय जाणकारांना वाटते.
अध्यक्षपदाचे काहीही आरक्षण पडले तरी मसूरचे जेष्ठ सदस्य मानसिंगराव जगदाळे हे उपाध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार आहेत. ते खटाव तालुक्यातील निमसोडचे जावई असल्याने त्यांच्या निवडीकडेही निमसोड जिल्हा परिषद गटाचे लक्ष आहे. अध्यक्ष पदाचे आरक्षण ओ.बी.सी. वगळता अनुसुचित जाती प्रवर्गाचे आले तर मानसिंगरावांशी उपाध्यक्ष पदासाठी सुरेंद्र गुदगे यांची स्पर्धा होवू शकते. या ठिकाणी गुदगे यांना डावलल्यास त्यांचे अर्थ व शिक्षण सभापती पदी बोळवण होवू शकते. तर कोरेगांव विधानसभा मतदारसंघ डोक्यात ठेवून प्रदिपआण्णा विधाते यांच्यासारख्या खानदानी शेतकर्याच्या गळ्यात कृषी सभापती पदाची माळ पडू शकते.
माण तालुक्यातील माजी आ. स्व. सदाशिव पोळ यांच्या थोरल्या सुनबाई डॉ. भारती संदिप पोळ या गोंदवले गटातून निवडून आल्या आहेत. पहिल्या टर्मलाच महिला बालकल्याण सभापती पदासाठी त्यांचे नांव आघाडीवर होते. मात्र ऐनवेळी गटबाजीच्या राजकारणातून स्थानिक पातळीवर त्यांच्या नावाला विरोध झाल्याने त्यांचे नांव मागे पडले. त्यांच्याशिवाय मार्डी गटातून निवडून आलेल्या त्यांच्या जाऊबाई सोनाली मनोज पोळ याही अभ्यासू सदस्या म्हणून परिचीत आहेत. त्यामुळे पदासाठी जाऊबाई जोरात असा सामना होवू शकतो. या सामन्यामध्ये निवृत्त आयुक्त व विधानसभेचे उमेदवार प्रभाकर देशमुख कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार याकडेही जाणकारांच्या नजरा आहेत. याशिवाय अध्यक्षपद अनुसुचित जाती प्रवर्गासाठी लागले तर समाजकल्याण सभापती प्रमाणेच आपल्याला लॉटरी लागेल या आशेवर औंध गटाचे शिवाजी सर्वगोड, जिल्हा नियोजन समिती प्रमाणेच आपल्या नावाला हायकंमांडची पसंती मिळेल या अपेक्षेवर सुनिता कचरे तर जिल्हा बँकेप्रमाणेच सभापती पदाला देखील नशिब फळफळेल का या अपेक्षेवर एनकूळकर खाडे कुटुंबिय व त्यांचे समर्थक कान लावून बसल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणूकीत कोण कसे वागले याचा चुकता हिशेब करुनच श्री देशमुख यांच्यासह माजी आमदार प्रभाकर घार्गे व इतर नेतेमंडळी आपले वजन संभाव्य इच्छुकांच्या पारड्यात टाकू शकतात. त्यामुळे आरक्षण सोडत व त्यानंतर होणार्या राजकीय घडामोडीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद आरक्षणाकडे खटाव-माणचे लक्ष
RELATED ARTICLES