Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीग्रेड सेपरेटरच्या कामामुळे वाहनचालकांची दैना

ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे वाहनचालकांची दैना

ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे वाहनचालकांची दैना
साताराः गेल्या दहा महिन्यापासून सातार्‍यात सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शहरातील वाहन चालकांची दैना उडाली आहे. नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहन चालकांचीच नव्हे तर व्यावसायिकांची गोची होऊ लागली आहे. सततच्या वाहनांच्या रहदारीमुळे धूळ दुकानात उडू लागल्याने व्यवसाय करायचा कसा, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. आता तरी नगरपालिकेने पुढाकार घेऊन ग्रेड सेपरेटर शेजारील रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
सातार्‍यातील वाढत्या वाहतूक कोडींची समस्या निर्माण झाल्यानंतर ही समस्या सोडवण्यासाठी शहरामध्ये भुयारी मार्गाचा तोडगा पुढे आला. तशा प्रकारचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवल्यानंतर केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाल्यानंतर पोवई नाक्यावर तत्काळ या कामास प्रारंभ झाला. या कामाचा शुभारंभ करण्यापूर्वी शहर वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. मात्र ज्या रस्त्यावरून ही वाहतूक वळवण्यात येणार आहे. त्यावरील खड्डे न भरणे, रस्त्याचे डांबरीकरण न केल्याने छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. शिवराज पेट्रोल पंपाकडून येणारी वाहतूक मोनार्क चौकातून राजवाड्याकडे वळवण्यात आली आहे. या मार्गावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या बाहेर सुमारे 500 मीटर रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण लागले असून या ठिकाणी दिवसभरात एक तरी वाहन चालकाचा अपघात होऊन कपाळमोक्ष होत असतानाही नगरपालिकेने खड्डे भरण्याचे धारिष्ट्यही दाखवले नाही. मुळात या रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण न केल्यास अपघाताच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुळामध्ये ग्रेड सेपरेटरच्या कामाला प्रारंभ करण्यापूर्वी नियोजित मार्गाच्या साईट पट्ट्या भरून संबंधित रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची गरज होती, मात्र नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे वाहन चालकांचे कंबरडे मोडू लागले आहे. ग्रेड सेपरेटरच्या कामाला गती आल्यामुळे पंचायत समितीकडून सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणारी वाहतूक डॉ. चित्रा दाभोळकर यांच्या हॉस्पिटलपासून वळविण्यात आली आहे. या कॉर्नरवर दोन ते तीन नामवंत हॉस्पिटल असल्यामुळे या ठिकाणी मेडिकल दुकानांची संख्या अधिक आहे. ही दुकाने रस्त्याकडेलाच आहेत. सततच्या वाहतुकीमुळे या रस्त्याची अक्षरश: वाट लागली आहे. त्यातच रॅमसन कलर लॅबपासून 200 मीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. तेथून पुढचा रस्ता कच्चा असल्याने या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहनांमुळे ही धूळ हॉस्पिटल, मेडिकलमध्ये जाऊ लागल्याने औषधांवर धूळ बसू लागल्याने मेडिकल व्यावसायिक त्रासून गेले आहेत. केवळ दुकानातच नव्हे तर घरांमध्येही धूळ जात असल्यामुळे विशेषत: गृहिणींमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. या मार्गावरील साईट पट्ट्या भरून रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी येथील व्यावसायिक व रहिवाशांमधून होऊ लागली आहे.
कॅप्शन- रस्ता बंदची खूण, आडवा ट्रॅक्टर लावून… अशी ही सातार्‍याची तर्‍हा आज सोमवारी दुपारी रविवार पेठेत पहायला मिळाली. एकीकडे ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे अनेक प्रमुख रस्ते बंद असतानाच लोणार गल्ली परिसरातील बोळवजा रस्ते डांबरीकरणासाठी बंद करण्यात आले. या रस्ता ठेकेदाराने बॅराकेटस उपलब्ध न झाल्याने कामातला ट्रॅक्टर व डांबराची बॅरलच असे रस्त्याला आडवा लावून रस्ता बंद असल्याचे सूचित केले आहे. आहे की नाही अफलातून कामगिरी. (छायाः अतुल देशपांडे)

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular