सातारा दि. ( प्रतिनिधी ) दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ऊर्जा निर्माण करू महाराष्ट्र अस्मिता जपली. समाजमनाचा ठाव घेत विपूल लेखन केले. सर्वहारा समाजसमूहाचं विशेषतः झोपडपट्टीवासीयांचे बकाल जगणं, ठसठसणारं दुःख – कष्टकरी, कामगारांच्या व्यथा वेदना यासाठी त्यांनी लेखणी झिजवली. त्यांचे साहित्य जगभर गाजले. रशियाने त्यांचा गौरवही केला. म्हणूनच भारताच्या साहित्य विश्वातला सम्राट म्हणजे अण्णाभाऊ साठे होय, असे प्रतिपादन विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी केले.
पिपल्स रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडियाच्या वतीने आज सातारा येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी स्थापलेल्या ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ या पहिल्या संघटनेचा शतकमहोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून अरुण जावळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण गाडे होते. सकाळी पिपल्स रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडियाचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पूष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी अंबवडे येथे स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
अरुण जावळे पुढे म्हणाले की, ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे, असे सूचित करून अण्णाभाऊ साठे यांनी या देशातला कष्टकरी – कामगार अशा राबणाऱ्या माणसाचे महत्त्व विशद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन गेले पाहिजे यासाठी ‘जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव’ असे त्त्यांनी उदगार काढले. परंतु तथाकथित साहित्यिकांनी आणि तत्कालीन नेते – पुढाऱ्यांनी अण्णाभाऊंना डॉ, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारछायेतून पुढे आणले नाही, अशी खंतही अरुण जावळे यांनी व्यक्त केली.
प्राचार्य अरुण गाडे यांनी अध्यक्षीय भाषणात अण्णाभाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श असे स्पष्ट करून अण्णाभाऊ साठे यांच्या सहित्यातील योगदनाबद्दल तसेच बहिष्कृत हितकारिणी सभेच्या संदर्भाने अभ्यासपूर्ण मांडणी केली. युवराज कांबळे यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेचा शतकोत्सवानिमित्त विचारमंथन घडवून आणले याबद्दल त्यांचे कौतुक केले. युवराज कांबळे यांनी प्रास्ताविकात म्हटले की, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि बहिष्कृत हितकारिणी सभेचा शतकमहोत्सव असा संयुक्त कार्यक्रम करण्यामागची भावना ही आहे की अण्णाभाऊंनी कष्टकऱ्यांच्या, शोषितांच्या, कामगारांच्यासाठी लेखणीतून आणि शाहिरीतून बंड छेडले, तर डॉ, आंबेडकरांनी सर्वहारा अशा अस्पृश्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, रचनात्मक कार्यासाठी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. त्यामुळे आपणास या संयुक्त सोहाळ्याच्या निमित्ताने परिवर्तनाचा व्यापक विचार पुढे घेऊन जावे लागेल असे अधोरेखित केले.
यावेळी संजय, शिंदे, राम निकम, नियाज शिकलगार ऋषीकेश किनईकर, मधूकर आठवले, किसन गव्हाळे आदी मान्यवरांसह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.