Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीदातांच्या किटाणूंशी करणार ढिशुम ढिशुम ; डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांच्या प्रबोधनानंतर चिमुरड्यांचा...

दातांच्या किटाणूंशी करणार ढिशुम ढिशुम ; डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांच्या प्रबोधनानंतर चिमुरड्यांचा निर्धार

भुईंज : समोर बसलेले चिमुरडे अवघ्या इयत्ता पहिली ते चौथीतील. एवढ्या कमी वयातील या विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्य यासारख्या अत्यंत रुक्ष विषयाचे महत्व डॉ.सुरभि भोसले-चव्हाण यांनी अतिशय हसत खेळत, एखादी गोष्ट सांगितल्याप्रमाणे पटवून सांगितली. आणि तब्बल एक तास हा अत्यंत महत्वाचा विषय या बाल विद्यार्थ्यांनी समजूत घेतला तो देखील जागचे न हलता किंवा कसलीही चुळबूळ न करता. हे अनोखे चित्र आश्‍चर्यचकीत करणारे होतेच शिवाय जेव्हा या चिमुरड्यांनी दातांच्या किटाणूंशी ढिशुम ढिशुम करणार, असा निर्धार केला तेव्हा हेच चित्र प्रभावीत करणारे ठरले.
भुईंज, ता. वाई येथील श्री महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या प्रियदर्शनी प्राथमिक विद्यामंदिरात मौखिक आरोग्य या विषयावर डॉ. सुरभि भोसले-चव्हाण यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी हे अनोखे चित्र दिसून आले. मुख्याध्यापिक रेखा वालेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. वास्तविक दातांच्या आरोग्याचे प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालले असून अज्ञानामुळे त्यामध्ये वाढच होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना बालवयापासूनच या विषयाची माहिती व्हावी, घ्यावयाची काळजी याबाबत प्रबोधन व्हावे, दातांचे आजार, त्याची भयानकता व वाढते प्रमाण याबाबत जागरुकता व्हावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज करीत माहिती देताना डॉ. सुरभि भोसले-चव्हाण यांनी तोंडाची व दातांची रचना, दातांच्या बाजू, दात घासण्याची पद्धत व त्यावेळी घ्यावयाची काळजी, जेवण केल्यानंतर दात स्वच्छ करण्याची पद्धत, दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक असणारा आहार व त्याबाबतची खबरदारी, दातांचे होणारे आजार व ते होवू नयेत याकरीता घ्यावयाची काळजी, टूथब्रश वापरावयाची माहिती अशी सर्व प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विशेष म्हणजे हि माहिती त्यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारीत, त्यांना प्रश्‍न विचारीत, विद्यार्थ्यांना भावतील अशी वेगवेगळी उदाहरणे देत आणि विद्यार्थ्यांना खळखळून हसवित दिली. त्यामुळे मार्गदर्शनपर व्याख्यान असे या कार्यक्रमाचे स्वरुप न राहता तो आनंददायी उपक्रम झाला.
तब्बल सव्वा तास सुरु असलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रश्‍नांची उत्तरे दिलीच शिवाय विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रश्‍न विचारले. मौखिक व दंतआरोग्य याबाबत बालवयातच विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध व वैद्यकीय माहितीने परिपूर्ण अशी माहिती मिळणे आवश्यक आहे. असे घडले तर बालवयातच होणार्‍या या दंत आरोग्य संस्कारामुळे भविष्यात उद्भवणार्‍या आजारांना मुळापासूनच आळा बसू शकेल. दातांंच्या अनारोग्याला खतपाणी घालणारी खाद्यसंस्कृती वाढत चालली आहे. तसेच मौखिक व दंत आरोग्य आरोग्याबाबत अज्ञान, अनास्था आदी विविध कारणांनी याबाबतचे प्रश्‍न भयानक रुप धारण करु लागल्याने याबाबतचे प्रबोधन अत्यंत आवश्यक व महत्वपूर्ण असल्याचेही डॉ. सौ. सुरभि भोसले-चव्हाण यांनी यावेळी सांगितले. मुख्याध्यापिक रेखा वालेकर यांनी डॉ. सुरभि भोसले-चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी शिक्षिका राजश्री जाधव, विद्या जायकर व योगेश मोरे उपस्थित होते. दरम्यान, श्री महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या प्रियदर्शनी गर्ल्स हायस्कूलमधील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थीनींना देखील डॉ. सुरभि भोसले-चव्हाण यांनी या विषयावर मार्गदर्शन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular