महाबळेश्वर ः काळी पिवळी टॅक्सी व टुरीस्ट टॅक्सी यांच्या संघटना मधील वादावर आज सातारा विश्रामगृहावर आ. शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षते खाली व उपप्रादेशिक परीवहन अधिकारी संजय धायगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वमान्य तोडगा काढण्यात आला असुन तो दोन्ही संघटनांनी मान्य केला आहे. बैठकीनंतर पाच वाजता येथे टॅक्सी संघटनेने बंद व धरणे आंदोलन मागे घेतले आहे.
पर्यटकांना फिरवण्यावरून येथील दोन्ही संघटनामध्ये वाद सुरू झाले होते. हा वाद अनेक दिवस धुमसत होता. वरचेवर या दोन्ही संघटनांच्या सभासदांमध्ये बाचाबाची होत होती. या प्रकरणी एका संघटनेने पोलिसांकडे तक्रार दिल्याने वाद अधिकच चिघळला या वादात पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु काळी पिवळी टॅक्सी संघटनेने त्यावर आक्षेप घेतला व आपल्या मागण्यासाठी टॅक्सी बंद व धरणे आंदोलन सुरू केले. दोन संघटनेतील वाद सोडविण्यासाठी आज सातारा विश्रामगृहावर संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीस आ. शशिकांत शिंदे उपप्रादेशिक अधिकारी संजय धायगुडे नगरसेवक नासिर मुलाणी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष नासिर पन्हाळकर, संदीप अक्षंतल, दत्ताजी वाडकर, तुकाराम बावळेकर, रोहीत ढेबे, यशवंत भिलारे, सी डी बावळेकर, अंकुश बावळेकर, प्रशांत आखाडे, शैलेश महाडीक, स्वप्नील पाटील, अनंत पार्टे, अशोक शिंदे, सचिन उतेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत सविस्तर चर्चा करून खालील निर्णय घेण्यात आले आहेत.
ज्या ग्रुप वाहतुकीवरून वाद सुरू झाले होते. त्या बाबत तीन वाहनामध्ये बसतील एवढे छोटे गु्रप वाहतुकीसाठी टुरीस्ट टॅक्सी संघटनेस परवानगी देण्यात आली आहे. त्या पेक्षा मोठे ग्रुप वाहतुकीस टुरीस्ट टॅक्सी संघटनेस मज्जाव करण्यात आला आहे. महाबळेश्वर दर्शनची तीन क्रमांकाची टुर सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. काळी पिवळी टॅक्सी संघटनेचे दर पत्रक टुरीस्ट टॅक्सी संघटनेच्या सभासदांनी वापरण्यावर बंदी करण्यात आली आहे. त्यांनी त्यांच्यासाठी वेगळे दर पत्रक तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ज्या ज्या वाहनांचे परवान्यांची मुदत संपली आहे अशा वाहनांनी प्रवासी वाहतुक करू नये. काही खाजगी वाहने येथे प्रवासी वाहतुक करतात. अशा वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. टुरीस्ट टॅक्सी व काळी पिवळी टॅक्सी यांचे परवाने बंद करण्यासाठी योग्य ती पुढील कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अशा प्रकारे ठरलेल्या निर्णयावर दोन्ही संघटनांच्या सभासदांनी मान्यता देण्यात आल्याने गेली अनेक दिवसां पासुन सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. तसेच टॅक्सी संघटनेने पुकारलेला बंद आज मागेे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले असल्याची माहीती दोन्ही संघटनांच्या प्रतिनिधी मंडळाने वार्ताहरांना दिली. या वेळी दोन्ही संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवासी वाहतूक संघटनेच्या वादावर पडदा, बंद मागे
RELATED ARTICLES