Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडी.. अन्यथा नागेवाडी खाणमालक संघटना उग्र आंदोलन करणार

.. अन्यथा नागेवाडी खाणमालक संघटना उग्र आंदोलन करणार

साताराः राष्ट्रीय महामार्गालगत नागेवाडी येथील खाणमालक संघटनेवर नागेवाडी परिसरातील काही ग्रामस्थ संयम न बाळगता प्रचंड बेछुट आरोप करत सुटले आहेत. त्यामुळे नागेवाडी खाणमालक संघटनाही पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा प्रत्यय लोकांपुढे येत आहे. वस्तूतः सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करत ही संघटना गेली अनेक वर्षे या परिसरात सामाजिक जबाबदारी ओळखून कार्यरत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधीनी आरोप करणार्‍या ग्रामस्थांना संागून पाहिले मात्र हे आरोप करणारे ग्रामस्थ सदर लोकप्रतिनिधीवरही चुकीचे आरोप करत आहेत त्यामुळे प्रशासनाची नाहक बदनामी होत असून हा गैरप्रकार ग्रामस्थांनी तातडीने थांबविला नाही तर खाणमालक संघटना अब्रुनुकसानीचे दावे ठोकणार असून प्रशासनानेही संबंधितांना योग्य ती समज द्यावी व हेे प्रकार थांबवावेत अन्यथा संघटना उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा नागेवाडी खाणमालक संघटनेने दिला आहे.
संघटनेवर आरोप करणारे हाताच्या बोटावर मोजण्याएवढे ग्रामस्थ संपूर्ण चुकीच्या पध्दतीने गैरसमज पसरवत आहेत. या खाण व्यवसायावर परिसरातील 800 ते 1000 कुटूबांचा रोजगार अवलंबून आहे. स्थानिक परिसरातील खाणकामगार, चालक, वॉचमन यांना हा रोजगार उपलब्ध केला आहे तसेच अप्रत्यक्षपणे या व्यवसायाशी निगडीत असलेले बांधकाम व्यवसायिक, मजूर, गवंडी, गॅरेज मेकॅनिक यांची संख्या मोठया प्रमाणात होत आहे. सरकारलाही खाणीतून मिळणारे उत्पन्नात रॉयल्टी, जीएसटी, आयकर, वीजबिले, आरटीओ टॅक्स, पर्यावरण कर आदी प्रकारचे उत्पन्न आहे व हे कर कायदेशीरदृष्टया भरून गेली अनेक वर्षे या खाणीत काम करीत आहेत.
संबंधित ग्रामस्थांनी निर्माण केलेल्या व आरोग्याच्या प्र्रश्‍नाबाबतही गैरसमज पसरवला जात आहे. कारण या खाणीमध्ये 20 वर्षाहून अधिक काळ काम करणार्‍या कामगारांनाही धुळीचा कोणताच त्रास होत नाही. कोणताही दमेकरी रूग्ण नाही संघटनेच्या वतीने अनेकवेळा येथे तपासणी शिबीरे, आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. संघटनेच्या ज्या खाणींनी रॉयल्टी भरली नव्हती त्यांची बाकी भरून घेण्यात आली असून ज्यांना दंड केला होता त्यांनीही दंडाची किंमत भरलेली आहे. प्रशासनावर आरोप करताना संबंधितांनी प्रचंड बेताल वक्तव्ये केली आहेत. यामध्ये सरकारी बाबू मलिदा खातात दंड आकारत नाही, मोजणी होत नाही हेही चुकीचे आहे. संबंधित खाण जागेची मोजणी रितसर 2011 मध्ये 2014, 2016 व 2018 मध्ये झालेली आहे. नुकतीच ही मोजणी प्रशानाने सीटीएस मशिनद्वारे केली असून यामध्ये पारदर्शकता जोपासताना ड्रोनच्या साह्यानेही ही मोजणी नुकतीच झाली आहे. खाणमालक संघटनेने या गावाच्या विकासासाठी मोठा निधी दिला आहे मात्र इतर ग्रामस्थांची कोणतीही तक्रार नसताना हे दोन चार लोक स्वतःचा फायदा करीत अक्षरशः खंडणी मागत इतरांना संघटनेबाबत गैरसमज करू देत आहेत.
खाण संघटनेच्या खाणी या ग्रामपंचायतीच्या ना हरकत दाखल्याशिवाय सुरूच होत नाहीत. काही दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने असे 7 ना हरकत दाखले वीज मीटरसाठी देण्यात आलेले आहेत. अनेक क्रशर कोटयावधी रूपयांची कर्ज काढूनही अद्याप उभी नाहीत तसेच त्यांचे कामही सुरू नाही. याठिकाणी लहान क्रशर असून कोणताही मोठा प्लॅन्ट नसताना हा व्यवसाय करणार्‍यांवर केलेले हे बेछुट आरोप संघटना सहन करणार नाही. याबाबत प्रशासनाने संबंधितावर तातडीने कारवाई करावी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular