रहिमतपूर: अमर रहे अमर रहे निवास गायकवाड अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, जब तक सुरज चाँद रहेगा, निवास तेरा नाम रहेगा अशा गगनभेदी घोषनांच्या निनादात हवालदार निवास गायकवाड यांना अखेरचा निरोप देण्यात आला. विराट जनसागराच्या साक्षीने कोरेगाव तालुक्यातील वाठार (किरोली) येथील हवालदार निवास गायकवाड अनंतात विलीन झाले. मंगळवारी सकाळी मुलगा आर्यन व बंधू विकास आणि प्रकाश यांनी अग्नी दिल्यानंतर गलबून गेलेला अवघा परिसरही अश्रूंनी चिंब झाला. वाठारच्या स्मशानभूमीमध्ये हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
हवालदार निवास गायकवाड दिल्ली येथे आर्मि मेडिकल कोर मध्ये देशाची सेवा करत होते. त्यातच त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या विरमरणाचे वृत्त तालुक्यात धडकल्यानंतर वाठार (किरोली) सह अवघा कोरेगाव तालुका शोकसागरात बुडाला होता. हवालदार निवास गायकवाड यांच्या पार्थिवाची प्रतीक्षा सार्यांनाच लागून राहिली होती. मंगळवारी सकाळपासून वाठार मध्ये मान्यवरांची रीघ लागली होती. अवघा परिसर हवालदार निवास गायकवाड यांच्या आठवणींनी गलबलून गेला होता. सोमवारी रात्री त्यांचे पार्थिव पुणे येथे आणण्यात आले होते. तेथून मंगळवारी सकाळी 7.30 वाजता पार्थिव वाठारमध्ये आणण्यात आले.
यावेळी तालुक्यासह जिल्हाभरातून विराट जनसागर लोटला होता. यावेळी निवास यांच्या कुटुंबासह नातेवाईंकांचा अश्रूंचा बांध फुटला. हवालदार निवास गायकवाड यांच्या वीरपत्नी स्मिता, मुलगा आर्यन, रोहित, आई, भाऊ आणि कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. त्यांचे पार्थिव दर्शनासाठी त्यांच्या घरासमोरील पटांगणात ठेवण्यात आले. त्यावेळी घरासमोर महिला आणि ग्रामस्थ यांनी पार्थिवाचे दर्शन घेतले. चौकाचौकामध्ये वीर जवान अमर रहे, जय जवान जय किसान असे बॅनर लावण्यात आले होते. तसेच गावामधून त्यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली मधून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर अंत्यदर्शनावेळी जि. प. सदस्य भिमराव पाटील, संभाजीराव गायकवाड, धैर्यशील कदम, विकास गायकवाड, उपसरपंच पोपटराव गायकवाड, निलेश माने, सातारा जिल्हा सैनिक बोर्डाचे चंद्रकांत पवार, सुभेदार पाटील साहेब, सुभेदार मुनीर देसाई, मेजर अविनाश गायकवाड, रहिमतपूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, सचिन राठोड, ग्रामसेवक बी. जी. पवार या मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी कोल्हापूर येथील 109 टी ए बटालियन यांनी बंदुकीच्या फ़ैरी झाडून सलामी देण्यात आली. अंत्ययात्रेमध्ये सर्व लहान थोर मंडळी तसेच सर्व गणेशोत्सव मंडळे, युवक वर्ग, महिला वर्ग आणि ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
जवान निवास गायकवाड यांना अखेरचा निरोप
RELATED ARTICLES