वडूज : अंबवडे गावच्या हद्दीत येरळा नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करणार्या ठिकाणावर धाड टाकून पोलीसांनी वाळूसाठ्यासह दोन जेसीबी, पाच ट्रॅक्टर, एक चारचाकी, तीन दुचाकी वाहने असा 76 लाख 68 हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलीसांनी अठरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबवडे गावच्या हद्दीत येरळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांच्या आदेशाने कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शशिकांत घाडगे, अविनाश राठोड, गणेश जगदाळे, राजेंद्र जाधव, संतोष नाळे, सतिश कर्पे, पोपट बिचुकले, सचिन राठोड, किशोर भोसले, सागर पाटील यांच्या पोलीस पथकाने याठिकाणी गुरूवारी (ता.31) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. त्याठिकाणी येरळा नदीपात्रात बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून आल्यानंतर पोलीसांनी संबंधितांकडे वाळू उपश्याच्या परवान्याबाबत विचारणा केल्यानंतर वाळू माफिया व पोलीसांत मोठी खळबळ माजली. त्यानंतर त्याठिकाणावरून पोलीसांनी विना आरटीओ पासिंगचे दोन जेसीबी, तसेच ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच. 11 सी.जी.61) तसेच अन्य चार विना आरटीओ पासिंगचे ट्रॅक्टर, एक चारचाकी क्रमांक (एम.एच. 11 बी.झेड. 1222) तसेच विना आरटीओ पासिंगची तीन दुचाकी वाहने ताब्यात घेतली.
पोलीसांनी वाळू उपश्याच्या ठिकाणी धाड टाकल्यानंतर एका जेसीबी चालकाने पोलीसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पोलीसांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी प्रसंगावधान राखत स्वत:चा जीव वाचविला. या प्रकारात त्या जेसीबी चालकाने तेथून जेसीबीसह पळ ठोकला.
या प्रकरणी पोलीसांनी अविनाश उमेश जाधव, अजित माधवराव पाटील, स्वप्नील सुनिल पाटोळे, सोमनाथ बाळू काळे, महेश रमेश जाधव, दादा कोंडीबा शिंगाडे, समीर गोडसे, युवराज माधवराव पाटील, सुधिर तानाजी माने, गोरख काळे, ब्रम्हानंद गलांडे, अक्षय माने, बाबु शंकर (पूर्ण नाव समजू शकले नाही), सुशांत पार्लेकर, बाबू गोडसे, सागर पवार, महेश नारायण गोडसे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधितांवर आपापसांत संगनमत करून आर्थिक फायद्याकरीता जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून पर्यावरणाचा र्हास करीत तसेच शासकीय कामांत अडथळा आणणे आदी कलमे लावण्यात आली आहेत. या प्रकारात पोलीसांनी 76 लाख 68 हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
या प्रकरणी आज पोलीसांनी संबंधितांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक शशिकांत घाडगे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी केलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
वाळूसाठ्यासह दोन जेसीबी, ट्रॅक्टर, चार चाकी, तीन दुचाकीसह 76 लाख 68 हजारांचा मुद्देमाल ताब्यात
RELATED ARTICLES