कराडःचला जनजागृती करू, कॅन्सर मुक्त समाज घडवू, असा नारा देत रोटरी क्लब ऑफ कराड चॅरीटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ कराड यांच्यावतीने सोमवार, दि. 4 रोजी जागतिक कॅन्सर दिनाचे औचित्य साधून कॅन्सर जनजागृती अभियान उपक्रमाअंतर्गत कराड शहरातून महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी निघणार्या रॅलीत कराड शहरातील शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, कृष्णा नर्सिंग कॉलेज, कृष्णा कॅन्सर निदान व उपचार विभाग कराड नगरपरिषद कॉटेज हॉस्पिटल कराड अर्बन बँक, इनरव्हील क्लब रोटरॅक्ट क्लब तसेच विविध संस्था संघटनेंचे कार्यकर्ते पदाधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. ही रॅली सोमवारी सकाळी दहा वाजता दत्त चौकातील सुरू होणार असून आझाद चौक, चावडी चौक, कन्या शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व कराड बस स्थानक मार्गे ही रॅली पुन्हा दत्त चौकात येणार आहे
काही दशकांपूर्वी कॅन्सर हा महाभयंकर रोग मानला जात होता. एखाद्याला याची बाधा झाली तर त्याचा अंत निश्चित असे मानले जात होते.
मात्र, अलीकडच्या काही वर्षात कॅन्सर या रोगावर सखोल संशोधन झाले आहे. सूक्ष्म जंतूच्या माध्यमातून शरिरात प्रवेश करून संपूर्ण शरिर पोखरणारी कॅन्सररुपी कीड संपुष्टात येते. कॅन्सरचे अचूक निदान व तात्काळ योग्य उपचार होऊन व्यक्ती कॅन्सर मुक्त होऊ शकते हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
या वास्तवाची जाण सर्व समाजघटकांना करून देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कराड चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब कराड यांनी गेल्या काही वर्षांपासून कॅन्सर जनजागृती अभियानात झोकून दिले. यातून कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या कॅन्सर निदान व उपचार विभागाच्या विशेष वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी करून काही संभाव्य कॅन्सर रुग्णांना योग्य वेळीच योग्य उपचार देऊन कॅन्सर मुक्त करण्यात यश मिळाले. यात क्लबच्या उपक्रमाचे मोठे योगदान राहिले आहे. या उपक्रमांसाठी लागणारा निधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने क्लबच्यावतीने शनिवार (दि.9) ते मंगळवार (दि.12) कराड शॉपिंग फेस्टिवल या उपक्रमाचे आयोजन बैल बाजार रोडवर खरेदी-विक्री संघाच्या समोर मार्केट यार्ड येथे करण्यात आले आहे.
तरी या कॅन्सर जनजागृती अभियानास सामाजिक बांधिलकीतून हातभार लावण्यासाठी शॉपिंग फेस्टीवल व महारॅलीत सहभागी व्हावे, असे आव्हान क्लबचे प्रेसिडेंट रो. डॉ. राहुल फासे, सेक्रेटरी रो. प्रबोध पुरोहित, फेस्टिव्हल प्रोजक्ट चेअरमन रो. जगदीश वाघ, को चेअरमन सागर जोशी व ट्रस्ट अध्यक्ष रो. शशांक पालकर, रो. राजेश खराटे, रो. विकास पाटील यांनी केले आहे.
जागतिक कॅन्सरदिनी कराड येथे रोटरी क्लबच्या वतीने जनजागृती महारॅलीचे आयोजन
RELATED ARTICLES