खंडाळा कारखान्यावरील कार्यक्रमाची तयारी पुर्ण
खंडाळा कारखान्यावरील कार्यक्रमाची तयारी पुर्ण मुख्यमंत्र्यासह चार दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती
खंडाळा ः किसन वीर- खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्या को-जनरेशन प्रकल्पाचे उद्घाटन, गणेश मंदिराच्या जागेचे भुमिपुजन, साखर पोत्यांचे पुजन व त्यानिमित्ताने आयोजित शेतकरी मेळावा या कार्यक्रमाची तयारी पुर्ण झाली असल्याची माहीती किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, खंडाळा कारखान्याच्या उभारणीनंतर प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री आणि चार दिग्गज मंत्र्याच्या उपस्थितीत भव्य दिव्य असा कार्यक्रम होत असल्याने या कार्यक्रमाची उत्सुकता वाढली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री सुभाषराव देशमुख, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन या दिग्गज मंत्र्याच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार (दि.4) रोजी सकाळी पावणे बारा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. हा भव्य असा कार्यक्रम सभासद शेतकर्यांना अनुभवता यावा यासाठी भव्य स्क्रिनचीही उभारणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रीमहोदयासाठी भव्य स्टेज तयार करण्यात आले आहे. शेतकरी सभासदांना बसण्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. या दौर्यासाठी प्रशासन पातळीवरून ही चांगला प्रतिसाद मिळत असून पोलीस प्रशासनाकडून आलेल्या सुचनांचे पालन करण्यात येत आहे. तसेच तिन्ही कारखान्यांनी गळीतास आलेल्या ऊसाचे पेमेंट शेतकर्यांच्या खात्यावर जमा केले असल्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे जास्तीत ऊस उत्पादक शेतकरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजेरी लावून हा कार्यक्रम न भुतो न भविष्यतो अशा पध्दतीने कार्यक्रम यशस्वी करतील, असा विश्वास मदनदादा भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.हा कार्यक्रम खंडाळावसियांच्या आणि परिसराच्या विकासाच्यादृष्टीने महत्वपुर्ण दिशा देणारा ठरणार असून या कार्यक्रमास खंडाळ्यासह, किसन वीर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार आणि दोन्ही संचालक मंडळाने केले आहे.