सातारा : कॅम्प सदरबझार परिसरातील वायसी कॉलेज ते आझाद कॉलेजच्या सर्व कॅम्पस् वर तीस कॅमेर्यातून नजर ठेवणार्या निर्भया पोलीस चौकीचे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सातार्याचा कॅम्पस आता शंभर टक्के छेडछाड मुक्त होणार, युवतींनी निर्भयपणे शिक्षण घ्यावे असे आवाहन नांगरे पाटील यांनी केले.
यावेळी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील यावेळी उपस्थित होते. या पोलीस चौकीला दोन स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. हा कॉलेज कॅम्पस परिसर संपूर्णपणे तीस सीसीटीव्ही कॅमेर्याने आरक्षित करण्यात आला आहे. या निर्भया पोलीस चौकीचे मंगळवारी विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या ऑडिटोरियममध्ये नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला. नांगरे पाटलांचे भाषणं ऐकण्यासाठी सगळा कॅम्पस गर्दीने भरून गेला होता. नांगरे पाटील म्हणाले सातारा शहरात जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून विद्यार्थिनी शिक्षणासाठी येथे येतात. त्यांना छेडछाडीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. युवतींनी भयमुक्त वातावरणात शिक्षण घ्यावे याकरिता अस्तित्वात आलेली निर्भया पोलीस चौकी लोकांच्या सेवेत रुजू होत आहे. महिलांच्या छेडछाडीचे कोणतेही प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. सडकसख्याहारींचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल. पोलीस यंत्रणा ही सतत महिलांच्या संरक्षणासाठी सज्ज आहे असे नांगरे पाटील म्हणाले.
निर्भया पोलीस चौकीचे लोकार्पण ; सडकसख्याहरींचा बंदोबस्त होणार ; वायसी कॉलेज ते आझाद कॉलेजच्या परिसरात तीस कॅमेर्यातून नजर ठेवणार
RELATED ARTICLES