पाटण:- (शंकर मोहिते) छत्रपतींनी पावन केलेल्या महाराष्ट्रातील दुर्गांनी स्वराज्य दिल, या दुर्गांनी स्वराज्य राखल, या दुर्गांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची किर्ती जगभर पसरवली. छत्रपतींचे हे सर्व दुर्ग स्वराज्याचे दैवत या भावनेतून संपुर्ण महाराष्ट्रात २४ फेब्रुवारी हा दिवस छत्रपती शिवमावळ्यांच्या कडून दुर्ग पुजन दिवस साजरा करण्यात आला. या अनुषंगाने पाटण तालुक्यातील सुंदरगड (दातेगड), भैरवगड, जंगलीजय गड, गुणवंत गडाचे छत्रपती शिव मावळ्यांनी दुर्ग पुजन केले. यावेळी गडावरील भगवा ध्वज, देव-देवतांची पुजा करून शिव प्रार्थना, शिववंदना म्हणून शिव घोषणांनी गड किल्ले दणाणून गेले.
सुंदरगड (दातेगड) संवर्धन समितीच्या शंकरराव कुंभार, लक्ष्मण चव्हाण, युसूफ हकीम, शंकर मोहिते, अनिल बोधे, निलेश फुटाणे, सुशांत शिंदे तर मुंबई येथून सायकल वरुन आलेला दुर्ग प्रेमी सुनील सपकाळ आणि हिंदू एकता समितीच्या छत्रपती शिवमावळ्यांनी पाटण महालातील प्रमुख असलेल्या सुंदरगडाचे व मोरगिरी येथील गुणवंत गडाचे दुर्ग पुजन केले. तर भैरवगड, जंगली जयगड येथे फॉरेस्ट डिपार्टमेंट चे आर.एफ.ओ. यांच्यावतीने दुर्ग पूजा करण्यात आली. यावेळी गडाच्या पायथ्याला नमण करून दुर्गपुजा करण्यात आली. तदनंतर गडावरील भगवा ध्वज, देव-दैवतांना अभिषेक पुजा करून दुर्ग पुजन करण्यात आले. तर सुंदरगड संवर्धन समितीचे मावळे मनोहर यादव यांनी भुषणगड ता. खटाव येथे गडावरीर श्री हरणाई मंदिराचे गुरव प्रथमेश पाटील धोंडीराम जगताप आणि शिवमावळ्यांच्या बरोबरीने भूषणगड दुर्ग पुजन केले.
गेल्या तीन वर्षांपासून २४ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्रात दुर्ग संवर्धन छत्रपती शिवमावळ्यांच्या वतीने दुर्ग पुजा दिवस साजरा करून सर्व दुर्गांचे पुजन करण्यात येते. गतवर्षी झालेल्या दुर्ग पुजांची दखल लिमका बुक आँफ रेकॉर्ड मधे झाली होती.