कराड: सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ व्हावी, या ग्रंथालय कर्मचार्यांच्या मागणीबाबत राज्यसरकार सकारात्मक असून, याप्रश्नी ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत लवकरच बैठक लावण्यात येर्अल, अशी ग्वाही श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली. स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी सुरू असलेल्या आंदोलनाला ना. भोसले यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी ते बोलत होते.
सार्वजनिक ग्रंथालयाच्या उनदानात वाढ करावी, या मागणीसाठी ग्रंथालय कर्मचारी कृती समितीचे राज्य संघटक रवींद्र कामत यांनी गेल्या आठ दिवसापासून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे. ना. डॉ. अतुल भोसले यांनी आज उपोषणस्थळी भेट देऊन श्री. कामत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ग्रंथालय कर्मचारी कृती समितीच्या विविध मागण्यांबाबत राज्यसरकार सकारात्मक असून, सार्वजनिक ग्रंथालयांचे अनुदान वाढविण्याबाबतही राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्याबाबत योग्य ती तरतूद करण्याबाबत शासन विचाराधीन असून, या मागणीसाठी शासनाकडे सर्वोतोपरी पाठपुरावा करण्याची ग्वाही ना. डॉ. भोसले यांनी श्री. कामत यांना दिली. तसेच याप्रश्नी लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक निश्चित करून कायमचा तोडगा काढण्याची हमी दिली.
यावेळी ग्रंथालय संचालनालयाचे सहाय्यक संचालक दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, शेतीमित्र अशोकराव थोरात, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार यांच्यासह ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रंथालयप्रश्नी राज्यसरकार सकारात्मक: ना.डॉ.अतुल भोसले
RELATED ARTICLES