सातारा : खा. उदयनराजेंच्या समर्थकांच्या बैठकीच्या पार्श्वभूमिवर आज आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांनी घेतलेल्या बैठकीत विरोधी काम करण्याचा सूर आळवला. या बैठकीला सातारा शहरातील नगर विकास आघाडीच्या आजी, माजी नगरसेवक व पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य यांची उपस्थिती होती. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये शिवेंद्रसिंहराजेंच्या आदेशावरून पदरमोड करून खा. उदयनराजेंचा प्रचार केला तरी दगडाखालील हात निसटताच खासदारांनी आम्हाला दुय्यम वागणुक दिली. खा. शरद पवार यांनी जरी पुन्हा खा. उदयनराजेंनाच उमेदवारी दिली तरी यावेळी मात्र शिवेंद्रसिंहराजेंचा शहरातील एकही कार्यकर्ता प्रचार करणार नाही, असा परखड इशारा कार्यकर्त्यांनी या बैठकीत दिला. दरम्यान उदयनराजेंच्या विरोधात आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या आक्रमक भुमिकेनंतर कार्यकर्त्यांनीही त्यापुढेही एक पाऊल टाकत उघडपणे बंड पुकारल्याने शिवेंद्रसिंहराजेंची भुमिका काय राहणार हा उत्सुकतेचा विषय ठरलेला आहे.
लोकसभेच्या पार्श्वभुमीवर सातारा जिल्ह्यातील खा. श्री. छ. उदयनराजे भोसले समर्थकांची बैठक सोमवार दि. 4 रोजी झाली होती. या बैठकीत खासदार समर्थकांनी विधानसभेला तुमची वेळ येईल त्यावेळी जागा दाखवून दिली जाईल असा इशारा दिला. यावर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीमधील आजी, माजी नगरसेवक, आणि पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यांच्या आज झालेल्या बैठकीत उदयनराजेेंचा प्रचार न करण्याचा इशारा देण्यात आला.
या बैठकीला जेष्ठ नगरसेवक अशोक मोने, माजी नगरसेवक जयेंद्र चव्हाण, नगरसेवक अविनाश कदम, अमोल मोहिते, शेखर मोरे-पाटील, रवि ढोणे, नगरसेविका दिपलक्ष्मी नाईक, लिना गोरे, मनिषा काळोखे, सोनाली नलवडे, बाळासाहेब खंदारे, माजी नगरसेवक हेमंत कासार, प्रकाश बडेकर, महेश जगताप, विजय तारू, रवि माने, हर्षल चिकणे, अतुल चव्हाण, जगन्नाथ किर्दत, शरद गायकवाड, नाना इंदलकर, महेश राजेमहाडीक, जर्नादन पिंटू जगदाळे, सुनिल जाधव, नासीर शेख, भालचंद्र निकम, अशोक जाधव, सचिन कांबळे, बलभिम शिंगरे, गणेश भोसले, बबलू सोलंकी, जयंत राऊत यांच्यासह पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यांची उपस्थिती होती.
जेष्ठ नगरसेवक अशोक मोने म्हणाले, नेते शिवेंद्रसिंहराजे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदेश मानून गेल्या दोन निवडणुकांमध्ये नगर विकास आघाडीच्या आजी, माजी नगरसेवकांनी प्रामाणिकपणे कामे केली. त्यांची निवडणुक पार पडली की, खासदारांची भुमिका गरज सरो आणि वैद्य मरो अशीच आजपर्यंत राहिली आहे. त्यामुळे यावेळी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. खा. शरद पवारांनी उदयनराजेंच्या उमदेवारीचा विचार करू नये. तसे घडल्यास शहरातील नगर विकास आघाडीचे आजी, माजी नगरसेवकांचा कायम विरोध राहिल.
नगरसेवक शेखर मोरे-पाटील म्हणाले, मिसळीचा कट लाल असतो, त्याप्रमाणे आमची सगळ्यांची डोकी भडकली आहेत. गोडोलीकरांनी त्यांना मिसळीचा कट कसा असतो, याचा नमुना दोन वर्षापुर्वीच दाखविला आहे. त्यामुळे त्यांचा काय परीणाम झाला आहे, हे त्यांना कळून चुकले आहे, असा टोला नगरसेवक बनकर यांचे नाव न घेता लगावला.
माजी नगरसेवक जयेंद्र चव्हाण म्हणाले, नगर पालिका निवडणुकीवेळी मी उभा असताना उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार होते. त्यावेळी माझ्या विरोधात वार्डामध्ये 42 मिटींगा व पाच पदयात्रा घेवून तसेच दहशवादाचा अवलंब करून विरोधी प्रचार केला. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे पदाधिकारी दिसले नाहीत का? या निवडणुकीत माझा व वैयक्तीक माझ्या कार्यकर्त्यांचा पूर्ण त्यांना विरोध हा कायम रहाणार आहे. जर खासदरच पक्षविरोधी कारवाया करत असेतर सामान्य पदाधिकार्यांनी खासदार विरोधी काम केले तर कुठे बिघडले. हीच भुमिका मुंबईत झालेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्यापुढे मांडली होती. यावेळी पक्षश्रेष्ठींनी तुम्हाला विचारात घेतल्याशिवास कोणता निर्णय घेतला जाणार नाही असे सांगीतले आहे. यावेळी नगर विकास आघाडीतील आजी, माजी पदाधिकार्यांनी शरद पवार यांनी खा. उदयनराजेंना उमेदवारी देवू नये यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामार्फत पुन्हा एकदा आम्ही भेट घेवून सांगणार आहे. त्यांनी जर उमेदवारी दिली तर सातारा शहरातील नगर विकास आघाडीचे सर्व आजी, माजी नगरसेवक विरोधी काम करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
खा. शरद पवारांनी उदयनराजेंना उमेदवारी दिली तरी विरोधीच काम करणार शिवेंद्रसिंहराजेंसह आजी, माजी नगरसेवक, समर्थकांचा इशारा
RELATED ARTICLES