सातारा : आर्थिक मोहाच्या लोभापायी एलआयसी एजंटच्या मदतीने भावाने सख्ख्या बहिणीला जिवंतपणीच मयत करून विम्याची रक्कम हडप करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रकाश श्रीपती मांढरे (रा. मांढरदेव) व जावली पंचायत समितीच्या माजी सभापतींचे पती एलआयसी एजंट अजय धर्मराज शिर्के (रा. वडाचे म्हसवे, ता.जावली) यांना वाई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रंगुबाई जगन्नाथ शिर्के (रा. म्हसवे) यांनी 28/12/2005 रोजी एलआयसी पॉलिसी काढली होती. त्याचा त्या दरमहा हप्ता भरत होत्या. या पॉलिसीला वारस म्हणून भाऊ प्रकाश श्रीपती मांढरे रा.मांढरदेव याचे नाव लावले होते. मात्र प्रकाश आणि अजय या दोघांनी संगनमताने रंगुबाई शिर्के यांचा बनावट मृत्यूचा दाखला तयार करून पॉलिसीची रक्कम हडप केली. यानंतर काही दिवसांनी मयत दाखवलेल्या रंगुबाई शिर्के या स्वत: वाई एलआयसी कार्यलयात हजर झाल्याने मोठी खळबळ माजली. त्यावेळी वारसांच्या बनावट कागदपत्रांचा उलगडा झाल्यावर कार्यलयातील प्रकाश जगन्नाथ चांभरे यांनी प्रकाश मांढरे आणि अजय शिर्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. परंतु हे संशयित आणि पोलिसांमध्ये आर्थिक साटेलोटे झाल्याने या दोघांना अटक झाली नव्हती. ही बाब नव्याने हजर झालेले पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे याच्या हे लक्षात आल्यावर सपोनि महेंद्र निबाळकर यांना तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी प्रकाश आणि अजय यांच्या घरावर पाळत ठेवली होती. अखेरीस काल मंगळवारी त्यांना अटक करण्यात आली.
बहिणीला मयत दाखवून पॉलिसीची रक्कम भावाने हडपली
RELATED ARTICLES