Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीकराड पंचायत समितीत चौघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

कराड पंचायत समितीत चौघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

कराड : चिखली तालुका कराड येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असणार्‍या सामाजिक सभागृहाला देण्यात आलेले शामराव आबाजी चव्हाण हे नाव काढून टाकण्यात यावे, या मागणीसाठी दीड वर्षापासून सुरू असणार्‍या पाठपुराव्याला यश न आल्याने गुरुवारी (ता.14) पंचायत समितीत गटविकास अधिकार्‍यांच्या केबिनमध्ये ग्रामपंचायत सदस्य ,तक्रारदार व अन्य दोघांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार महेश धर्मेंद्र पाटील यांनी वर्षभरापूर्वी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असणार्‍या सामाजिक सभागृहाला देण्यात आलेले श्यामराव आबाजी चव्हाण हे नाव काढून टाकण्यात यावे अशी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सदस्य बंडोराव ज्ञानदेव सावंत यांच्यासह काहीनी या नावाला विरोध दर्शवला आहे. तर ग्रामपंचायतीमधील सात सदस्यांनी हे नाव काढले जाणार नाही असा पवित्रा घेतला आहे.
या दोन्ही गटाच्या तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी हे नाव कायदेशीर दृष्ट्या योग्य नसल्याने ते काढून टाकण्यात यावी असे पत्र ग्रामसेवक यांना दिले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे तक्रारदार महेश पाटील यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान गुरुवारी दोन्ही गटातील सदस्य व तक्रारदार यांना चर्चेसाठी गटविकास अधिकारी डॉ. पवार यांनी कार्यालयात बोलावले होते. बैठकीस सरपंच वंदना माळी, ग्रामसेवक चंद्रकांत धिंदळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
बैठकीत डॉक्टर पवार यांनी सभागृहाचे नाव काढावे लागेल असे सदस्यांना सांगितले. मात्र सदस्य ते नाव आम्ही काढणार नाही या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे नाराज झालेले तक्रारदार महेश पाटील, सदस्य बंडोराव सावंत, विजय सदाशिव जगताप, बापूराव रामदास जाधव यांनी कार्यालयातच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
कर्मचार्‍यांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना परावृत्त केल्याने अनर्थ टळला. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular