रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या शुभेच्छा
फलटण: सातारा जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अण्य नेते मंडळींच्या उपस्थितीत मुंबईत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना आज मुंबईत शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी माढा लोकसभा जिंकूनच या अशा शुभेच्छा रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना दिल्या.
माजी खासदार व संघर्षशील नेतृत्व म्हणून सर्वश्रुत असणारे हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव रणजीतसिंह यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. माढा लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून उमेदवारीचे ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाषराव देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. राज राजपुरोहित, आ. प्रशांत परिचारक, माजी खासदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार शहाजीबापू पाटील, सोलापूर जिल्हा भाजपा अध्यक्ष शहाजी पवार, सातारा जिल्हा भाजपा उपाध्यक्ष अनिल देसाई, आदी माण्यवरांच्या उपस्थितीत मुंबई येथे नुकताच त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
पक्ष प्रवेशानंतर लगेच रणजीतसिंह यांची माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी घोषीत होईल असे कार्यकर्त्यांना वाटत होते परंतू तसे न घडल्याने पक्ष प्रवेशावेळी मोठ्या प्रमाणात जमलेल्या रणजीतसिंह यांच्या समर्थकांमध्ये चुळबुळ सुरु झाली होती. परंतू या कार्यक्रमानंतर रणजीतसिंह हेच माढ्यातून भाजपाचे उमेदवार असतील असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खाजगी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले. पक्ष प्रवेशानंतर आज रणजीतसिंह यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी रणजीतसिंह यांनी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस वंदन केले.
यावेळी उध्दव ठाकरे यांनी माढा लोकसभा जिंकूनच या अशा शुभेच्छाही रणजीतसिंह यांना दिल्या तसेच माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या तब्येतीचीही त्यांनी आस्थापुर्वक चौकशी केली व फलटणला आल्यावर त्यांची भेट घेण्याचे संकेतही दिले. यानंतर रणजीतसिंह यांनी शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचीही मुंबई येथे भेट घेतली. माढा लोकसभा मतदार संघात परीवर्तन हे अटळ असून युतीचाच उमेदवार येथून निवडणून येणार असल्याचे सांगत माढा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या नेत्यांना देसाई यांनी फोनद्वारे कामाला लागण्याचे आदेश दिले.
‘माढा लोकसभा जिंकूनच या’
RELATED ARTICLES