पाटण :- सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना पाटण पोलिसांना निसरे फाटा येथे मंगळवारी वाहन तपासणीत एका वाहनात ४६ लाख रुपयांची रोकड आढळून आली. मात्र हि रोकड बँकेची असल्याचे पाटण पोलिसांनी सांगितले. सायंकाळी उशिरापर्यंत अधिकाऱ्यांसोबत पाटण पोलिसांकडून कागदपत्रांची तपासणी व पंचनामा करण्याचे काम सुरू होते.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहितेचा भंग होवू नये यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलून ठिकठिकाणी पथके कार्यरत केली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सातारा जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पोलिसांकडून कडेकोठ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणीही केली जात आहे.
मंगळवार दि. २ रोजी पाटण-कराड मार्गावरील निसरेफाटा येथे वाहनातून ४६ लाख रुपयांची रोकड पाटण पोलिसांना सापडली. ही रोकड नक्की कोणाची व कशासाठी आणली आहे याबाबत पोलिसांकडून सायंकाळी उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. घटनास्थळी पाटणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यु. एस. भापकर, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, मल्हारपेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे यांच्यासह अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी व पंचनामा सुरू होता.
याबाबत पाटणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यु. एस. भापकर यांच्याशी संपर्क साधला असता रोकड मिळाली असून ती बँकेच्या दोन ते तीन शाखांची आहे. याबाबत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.