कराड: येथील कृष्णा हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आत्मभान या व्यक्तिमत्व विकास शिबीराला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. या शिबिरात विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्रीय पैलूंचा अभ्यास करून, त्यांना व्यक्तिमत्व विकासाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा हॉस्पिटलच्यावतीने समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने विविध विषयांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून 11 ते 14 वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आत्मभान या पाचदिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. वसंतमेघना मूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या वैशाली यादव आणि समुपदेशक शुभांगी जमाले यांनी सहभागी विद्यार्थ्यांना विविध खेळ व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून स्मरणशक्ती कशी सुधारावी, एकाग्रती कशी वाढवावी, सृजनशीलता, संवाद कौशल्यांचा विकास, समस्या कशा हाताळाव्यात याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांची बुध्यांक मापनचाचणी, भावनिक बुध्यांकमापन करून त्यांचा कल तपासण्यात आला.
शिबिराच्या शेवटच्या दिवशी पालकांचेही समुपदेशन करून, त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. शास्त्रीय पद्धतीने केलेल्या मार्गदर्शनामुळे हे शिबीर मुलांच्या जडणघडणीसाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरेल, असे गौरवोद्गार पालकांनी समारोप सोहळ्यात काढले. दरम्यान, मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात पुन्हा एकदा अशा स्वरूपाच्या शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
कृष्णा हॉस्पिटलमध्ये आयोजित आत्मभान शिबीराला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद
RELATED ARTICLES