Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीबिचुकलेच्या नथीतून विरोधकांकडून तीर मारण्याचा प्रयत्न

बिचुकलेच्या नथीतून विरोधकांकडून तीर मारण्याचा प्रयत्न

विविध दलित संघटनांचा सातार्‍यातील पत्रकार परिषदेत आरोप
सातारा : अभिजीत बिचुकले याने अ‍ॅट्रोॅसिटीद्वारे जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर व सहकार्‍यांवर केलेले आरोप निखालस खोटे आहेत. विकृत व विक्षिप्त मनोवृत्तीच्या या व्यक्तिने ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून उदरनिर्वाह आणि अपप्रसिद्धी मिळवण्याचे तंत्र अवलंबले आहे. मात्र विदूषकी चाळे करणारा हा मनुष्य समाजालाच कलंक आहे. ऐन निवडणुकीच्या काळात विरोधी उमेदवाराकडून आर्थिक तडजोडींद्वारे बिचुकलेचा गैरवापर करून आणि अ‍ॅट्रोॅसिटीच्या नथीतून उदयनराजेंवर तीर मारण्याचा वृथा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप सातारा जिल्ह्यातील विविध दलित संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी सातार्‍यातील पत्रकार परिषदेत केला.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीपभाऊ शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रवीण धस्के, रिपाईचे ज्येष्ठ नेते अण्णा वायदंडे, रिपाई ब्लु फोर्स संघटनेचे दादासाहेब ओव्हाळ, स्वाभिमानी रिपब्लिकनचे रामदास कांबळे, भीमशक्तीचे बाळासाहेब शिरसाठ, रिपाइ कवाडे गटाचे युवराज कांबळे, रिपाइ गवई गटाचे संजय गाडे, वामन म्हसके, शिवाजी भिसे आदींनी ही पत्रकार परिषद घेतली. याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोणतीही नैतिक आणि राजकीय पार्श्वभूमी नसताना अभिजित बिचुकले नावाची व्यक्ती आपल्या विकृत व विक्षिप्त वर्तनाने समाजाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करत असते. मूळात तो सातारा नगरपालिकेचा बडतर्फ कर्मचारी असून त्याचे सामाजिक वर्तन नेहमीच विचित्रपणाचे राहिले आहे. स्वतःस नेता म्हणवणार्‍या या विकृत व्यक्तीने आजवर नेहमीच प्रत्येक निवडणुकांमध्ये उभे राहण्याचा सपाटा लावला आहे. लोकशाहीने प्रत्येकाला निवडणुकीस उभे राहण्याचा हक्क दिला आहे. मात्र केवळ फुकटची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि उमेदवारी मागे घेण्यासाठी अर्थपूर्ण तडजोडी करून पैसे कमावणे हाच त्याचा एकमेव धंदा आहे. आजवर बिचुकले याने दाखल केलेल्या अट्रोसिटीच्या केसेस केवळ निवडणुकीच्या काळात आणि विरोधी उमेदवारांच्या समर्थकांवरच केल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार केवळ पैसे मिळवण्यासाठीच तो करत असतो, असा आरोप करून या पत्रकात पुढे म्हटले आहे की, दलित समाजास ऍट्रॉसिटी कायदा वरदानच आहे. मात्र बिचुकलेसारख्या व्यक्तीकडून त्याचा होत असणारा त्याचा गैरवापर अन्य जातीच्या व्यक्तींप्रमाणेच दलित समाजालाही त्रासदायक ठरणारा प्रकार आहे
सध्या लोकसभा निवडणूक सुरु असून या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्रपक्षाच्या आघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या निकटवर्तीयांवर केलेले आरोप व दाखल केलेलया तक्रारी अन्य विरोधी उमेदवारांच्या संगनमताने व आर्थिक लागेबांध्यातून केल्याचेही या पत्रकात म्हटले आहे. त्यास दुजोरा मिळण्यासाठी बिचुकले याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढल्यास या मागचे सत्य बाहेर येईल, असेही या पत्रकात पुढे म्हटले आहे.
वास्तविक बिचुकले याची पुरोगामी व धर्मनिरपेक्ष विचारांशी कोणतीही बांधीलकी नाही. या उलट त्याच्या घरामध्ये देवरूसपणाचे काही देव्हारे आहेत. समाजातील भोळ्याभाबड्या व दुर्बल मनोवृतीच्या लोकांना देवरूसपणाची भीती घालून, त्यांना भुलवण्याचा आणि त्यांना अंधश्रद्धेच्या जोखडात अडकवून दडपण आणण्याचा प्रकारही त्याच्याकडून होत असतो. त्यामुळे बिचुकले हा समाजालाही कलंक आहे, असेही विविध दलित संघटनांच्या नेत्यांनी या पत्रकात म्हटले आहे
नगरसेवक पदापासून राष्ट्रपतिपदापर्यंतच्या विविध निवडणुकांना उभे राहणे आणि माघारीसाठी आर्थिक तडजोडी होण्यासाठी इतरांना वेठीस धरणे हाच त्याचा उद्योग असतो व इतर वेळी समाजात अंधश्रद्धा पसरवून देवरूसपणाची भीती दाखवून आपली तो रोजीरोटी चालवतो. अशा व्यक्तीचा या सर्व संघटनांनी निषेध केला आहे. तसेच लवकरच अंधश्रद्धाविरोधी कायद्याच्या माध्यमातून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी कार्यकर्ते मागणी करणार आहेत. तसेच विरोधी उमेदवारानेही अ‍ॅट्रोॅसिटीच्या कायद्याचा आणि बिचुकलेच्या जातीचा गैरवापर करत खेळलेल्या कूटनीतीला काळ क्षमा करणार नाही, असेही या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular