सातारा : सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी चुरशीने सहा विधानसभा मतदार संघातून सरासरी 60 टक्क्याच्या पुढे मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र रात्री उशीरापर्यंत सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील व्होटींग मशिनचे मतदान रात्री उशीरापर्यंत सुरु असल्यामुळे अधिकृत आकडेवारी उपलब्ध झालेली नव्हती. मात्र 60 टक्क्याहून अधिक मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली. दरम्यान, पाटण, 56 टक्के, कोरेगाव 60 टक्के, वाई 55 टक्के, सातारा 50.36 टक्के, कराड उत्तर 60, कराड दक्षिण 63 याप्रमाणे चुरशीने मतदान मतदान झाले आहे. सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले, व शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासह एकूण 9 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे. दि. 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 60.63 टक्के मतदान
कोरेगाव : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मंगळवारी दिवसभरात शांततेत 60.63 टक्के मतदान झाले. एकूण 2 लाख 96 हजार 797 मतदारांपैकी 1 लाख 79 हजार 953 मतदारांनी मतदान केले. 96 हजार 508 पुरुष तर 83 हजार 445 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामीण भागात व्हीव्हीपॅट मशिन्सबाबत मतदारांनी तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाने वेळेत बदल केल्याने मतदान प्रक्रियेत कोणताही व्यत्यय आला नाही. पोलिसांनी 12 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 354 मतदान केंद्रे असून, सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. 7 ते 9 या पहिल्या दोन तासात 6.22 टक्के, 9 ते 11 या दुसर्या दोन तासात 19.63 टक्के मतदान झाले. 11 वाजल्यानंतर मतदानाचा वेग कमी झाला. दुपारी 1 वाजेपर्यंतच्या दोन तासांमध्ये 33.83 टक्के मतदान झाले होते. दुपारी 1 ते 3 या दोन तासात 43.78 टक्के तर 3 ते 5 या दोन तासात 54.31 टक्के मतदान झाले. दुपारी 4 वाजल्यानंतर मात्र मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. कठापूरमध्ये तर भली मोठी रांग लागली होती. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 60.63 टक्के मतदान झाले. पाडळी स्टेशन, धुमाळवाडी (नांदगिरी), कवडेवाडी येथे मतदान यंत्रांमध्ये बिघाड असल्याची मतदारांची तक्रार होती, मात्र क्षेत्रीय अधिकार्यांनी मतदान यंत्राविषयी तंत्रज्ञांना पाचारण केले, तसेच पर्यायी व्यवस्था केल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत होती. मतदारसंघातील धुमाळवाडी (नांदगिरी) व पुसेगाव येथे अनुक्रमे नवरदेव आणि नवरी मुलीने विवाहाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले.
निवडणूक निरीक्षकांच्या भेटी व पाहणी
निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा, खर्च निरीक्षक अल्पेश परमार यांनी मतदान प्रक्रियेच्या सरस्वती विद्यालयातील मध्यवर्ती नियंत्रण कक्ष व या परिसरात असलेल्या मतदान केंद्रांना भेटी दिल्या. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सौ. कीर्ती नलावडे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सौ. रोहिणी शिंदे, नायब तहसीलदार श्रीरंग मदने, अमर रसाळ, सुयोग बेंद्रे यांनी अधिकार्यांना मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. कांतीलाल वीरचंद भंडारी प्राथमिक विद्यालयातील ङ्गपिंक पोलिंग स्टेशनफला या अधिकार्यांनी भेटी दिल्या. तेथील सर्व महिला अधिकार्यांशी त्यांनी संवाद साधला. या केंद्राच्या आकर्षक रचनेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
12 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
कोरेगाव, रहिमतपूर, वाठार किरोली, खेड (नांदगिरी) व किन्हई येथे मतदान केंद्राच्या परिसरात मतदारांशी हितगुज करत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे उघडपणे उल्लंघन करणार्या 12 जणांना पोलिसांनी सुरुवातीला समज दिली, मात्र त्यांच्या वर्तवणुकीमध्ये फरक न पडल्याने त्यांना पोलिसी हिसका दाखवत पोलीस ठाण्यात आणून, त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम 68 व 69 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. सायंकाळी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, संतोष साळुंखे व पोलीस पथकाने ही प्रतिबंधात्मक कारवाई केली.
वाई विधानसभा मतदार संघात 55% मतदान
वाई : वाई विधानसभा मतदार संघात व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याने मतदारांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे काही ठिकाणी एक तास वाढवून देण्यात आला तर किरकोळ बिघाड झालेल्या ठिकाणी वेळ वाढवून देण्यात न आल्याने काही ठिकाणी वादाचे प्रसंग निर्माण झाले, व्हीव्हीपॅट मशिनच्या बिघाडामुळे काही ठिकाणी लोकांच्या उत्साहावर विरजण पडले, त्यातच काही आज शिळी यात्रा असल्याने मतदार मतदान न करताच परत फिरला.
सकाळी उत्साहाच्या वातावरणात मतदान करण्यासाठी मतदारांनी चांगली गर्दी केल्याचे दिसून आले परंतु व्हीव्हीपॅट मशिनच्या बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मतदारांना मतदान करता आले नाही. तर काही गावांनी पाण्याची समस्या गंभीर असल्याने मतदानावर बहिष्कार टाकला. सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेचा प्रारंभ झाला तर सायंकाळी सहा वाजे पर्यंत मतदानाची वेळ असल्याने सकाळ व संध्याकाळी मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजाविला. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने मतदार राजा मतदानासाठी बाहेर पडला नाही त्यामुळे मतदान केंद्रावर दुपारच्या वेळेस शांतता दिसून आली. सकाळी आकरा वाजे पर्यंत 21% मतदान झाले, दुपारी एक वाजे पर्यंत 34% मतदान झाले. तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत 53% टक्के मतदान झाले. तर संध्याकाळी सहा वाजता वाई विधानसभा मतदार संघाचे 55% मतदान झाले. काही मशिनच्या तांत्रिक अडचणी सोडल्या तर बाकी मतदान सुरळीत पार पडले.
पाटण विधानसभा मतदार संघात 56 टक्के मतदान
पाटण : सातारा लोकसभा निवडणुकीसाठी पाटण तालुक्यात सुमारे 56 टक्के च्या दरम्यान मतदान झाले. सकाळ वेळी पाटण तालुक्यातील 22 ठिकाणी बॅलेट युनिट, 10 ठिकाणी कंट्रोल युनिट व 21 ठिकाणी व्ही. व्ही. पॅड मशिनमध्ये बिघाड निर्माण झाला होता. तेथे तात्काळ राखीव नवीन यंत्रे दिल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. तालुक्यात सर्वच ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि डि.वाय.एस.पी. अगंध जाधवर यांनी दिली.
मंगळवार दि. 23 रोजी सकाळी 7 वाजता प्रत्यक्षपणे मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत मतदारांनी गर्दी केली होती. यामध्ये महिलांसह ज्येष्ठांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत होता. सकाळी 11 पर्यंत पाटण तालुक्यात सरासरी 21.29 टक्के मतदान झाले होते. 11 वाजल्यानंतर मात्र प्रचंड उन्हाचा तडाखा लागत असल्याने दुपारी 4 वाजेपर्यंत सर्वच मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी पहावयास मिळत होती. चार नंतर उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर मतदारांनी घराबाहेर पडून मतदान केले. यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 56 हजार 815 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. दिवस भरात मात्र नव मतदार युवक – युवती मतदारांनी मोठ्या उत्साहाने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केले.
एकूण 2 लाख 97 हजार 781 मतदारांपैकी 76 हजार 666 पुरुष मतदारांनी मतदान केले. तर 80 हजार 149 महिला मतदारांनी मतदान केले. पुरुषांपैक्षा महिला मतदारांनी मतदान करण्यासाठी आघाडी घेतली.
यावर्षी प्रथमच निवडणूक आयोगाकडून सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. त्यानुसार येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात केंद्र क्र. 139 वर सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. केंद्रात सजावट करून केंद्राबाहेर मतदारांच्या स्वागतासाठी कमान उभारून आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. या केंद्रावर क्षेत्रिय अधिकारी शामली कात्रे, केंद्राध्यक्षा विजया नांगरे, मतदान अधिकारी शैला कदम, शोभा लोणी, शिलादेवी पाटणकर, संगीता डुबे, पोलीस हवालदार अश्विनी घोरपडे, अंगणवाडी सेविका नेहा गायकवाड, स्वाती पवार, आशा सेविका उमा महाडीक आदी महिला कार्यरत होत्या. त्यांनी यशस्विपणे मतदान प्रक्रिया पार पाडली.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रामहरी भोसले, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, नायब तहसीलदार डी. एल. लोंढे, बजरंग चौगुले, शकील मुल्ला, मंडलाधिकारी आनंदा सपकाळ, हणमंत शेजवळ, निलेश येडपलवार, राहूल कंदारे, महादेव अष्टेकर, सागर ठोंबरे, आर. एम. चव्हाण, अजमुद्दीन मुलाणी यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, महसूल कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. तर मतदानाच्यादिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्याचबरोबर मतदान शांततेत पार पडण्यासाठी पाटण तालुक्यात उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधववर, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मतदानाचा टक्का घसरला
मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पाटण विधानसभा मतदारसंघातून 58 ते 60 टक्के च्या दरम्यान मतदान झाले होते. मात्र चालू 2019 लोकसभा निवडणुकीत हि टक्केवारी घसरुन 56 टक्के वर आली. सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छ. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शिवसेना- भाजप युती कडून पाटण तालुक्यातील स्थानिक उमेदवार नरेंद्र पाटील यांची उमेदवारी होती. या पाश्वभूमीवर पाटण तालुक्यातून उस्फुर्त मतदान होईल असे वाटले होते. मात्र मागील निवडणूकी पेक्षा मतदानाचा टक्का घसरल्याने उमेदवारांच्यां भवितव्याचा अंदाज सांगणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष 23 मे रोजी होणार्या निकालावर लागले आहे.
खटाव तालुक्यात काही ठिकाणी यंत्रात बिघाड
वडूज : माढा लोकसभा मतदारसंघातील माण मतदारसंघात सरासरी 52.47 टक्के मतदान झाले. काही गावातील मतदान यंत्रातील बिघाड वगळता संपुर्ण माण विधानसभा क्षेत्रात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.
माण मतदारसंघात 52.65 % पुरुषांनी तर 52.27 टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. अनफळे, तडवळे, वाकेश्वर या तिन ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला. यापैकी अनफळे येथे सुमारे एका तासापेक्षा अधिक वेळ मतदानाचा खोळंबा झाला. तर अन्य दोन्ही ठिकाणी किरकोळ बिघाड झाल्याने 10 ते 15 मिनीटात प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली. सकाळी काही वेळ मतदानासाठी रांगा होत्या. तद्नंतर दुपारी उन्हामुळे मतदानाचा वेग थंडावला होता. दुपारी चारनंतर मतदानाचा वेग वाढला.
मल्हारपेठ मतदान केंद्रावर 55 टक्के मतदान
मल्हारपेठ : मल्हारपेठ येथे लोकसभेसाठी सरासरी 55 टक्के मतदान झाले आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत हा आकडा फक्त 18 टक्के होता दुपारी उन्हामुळे माईड्सन केंद्रावर शांतता होती दुपारी चार नंतर मतदारानी पुन्हा मतदानासाठी गर्दी केली सहा वाजेपर्यंत मल्हारपेठ केंद्रावर सरासरी पंचावन्न टक्के मतदान झाले. सकाळी अकरा वाजलेच्या सुमारास एका मशिनचा बिघाड झाला अर्ध्या तासानंतर लगेच त्या ठिकाणी दुसरे मशिन मतदान यंत्र जोडणेत आले दिवसभर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
मल्हारपेठ मतदान केंद्रावर असलेल्या पाळणा घरातही काही महिलांनी आपली लहान मुले बसवून मतदानाचा हक्क बजावला. या मतदान केंद्रास डीवायएसपी अंगद जाधवर मल्हारपेठचे पी एस आय दिगम्बर अतिग्रे आदिशनल एस. पी. धीरज पाटील झोनल आफिसर विशाल कोतांगडे हरिभाऊ भुजबळ तसेच जिल्हा परिषद सदस्य विजय पवार पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर यांनी भेटी दिल्या मल्हारपेठ मतदान केंद्रावर 3755 पैकी 2068 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावीला मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
फलटण येथे 63 टक्के मतदान
फलटण – 43 माढा लोकसभा मतदार संघाच्या सन 2019 सार्वत्रिक निवडणुकीत 255 राखीव असलेल्या फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आज झालेली मतदान प्रक्रिया तब्बल 35 ते 40 ठिकाणी मतदान यंत्रामध्ये भिघाड झाल्याने या निवडणुकीत मोठया प्रमाणात मतदारांची नाराजी झाली या मुळे मतदान टक्केवारी वर परिणाम दिसून आला तथापि सायंकाळी 6 नंतरही मतदानासाठी रांगा सुरू होत्या. फलटण कोरेगाव विधान सभा मतदार संघातील एकूण 3 लाख 30 हजार 163 मतदारा पैकी एकूण 2 लाख 8 हजार 67 मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातील 63 टक्के मतदान झाले आहे.
आज दि 23 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून 342 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली सकाळचा प्रहर असल्याने सर्व मतदान केंद्रावर महिला पुरुष युवक मतदारांच्या मतदानासाठी रांग लागल्याचे चित्र होते दुपारी एक वाजेपर्यंत या मतदारसंघात 35 टक्के मतदान झाले होते उन्हाचा चटका असल्याने मध्यंतरीच्या कालावधीत मतदारांची संख्या तुरळकच दिसत होती मात्र दुपारी 4 वाजल्यापासून अनेक मतदान केंद्रावर पुन्हा मतदाना साठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या एकूणच दिवस भराच्या मतदान प्रक्रियेस मतदाना साठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे जाणवत होते.
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर या दिगजनी फलटण शहरातील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला तर आमदार दीपक चव्हाण यांनी तरडगाव येथे तसेच महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांचा सुविद्य पत्नी जिल्हा परिषद सदस्या सौ जिजामाला नाईक निंबाळकर यांनी निंभोरे ता फलटण येथे आपला मतदानाचा हक्क बजावून सर्वानी मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले या वेळी ते म्हणाले येत्या 23 मे ला नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीएचे सरकार स्थापन होईल असा विश्वास त्यांनी स्थानिक पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
फलटण तालुक्यातील सासकल,भाडळी येथील मतदान केंद्रावर व्हीव्हीएम मशीन 1 तास उशिरा चालू झाली तर भेलकठी येथील मतदान केंद्रावर सुमारे दोन तास कामकाज ठप्प होते. मुधोजी हायस्कूल येथील मतदान केंद्रांवर पूर्ण एका पायाने अपंग असलेल्या मतदाराने आपला हक्क वाजविला तर मुधोजी प्राथमिक बालक मंदिर येथे 101 वर्षीय सुफीया अहमद काजी या वृद्ध महिलेने मतदानाचा हक्क बजाविला.
निवडणूक मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या विधानसभा मतदारसंघात 342 मतदान केंद्रासाठी 45 अधिकारी, 3168 कर्मचारी नेमण्यात आले होते 65 मतदान यंत्रे राखीव ठेवण्यात आली होती अपंग मतदारांसाठी व्हील चेअर ची सुविधा तसेच फलटण येथील मुधोजी हायस्कूल येथे महिलांसाठी सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते लहान बाळांसह आलेल्या महिलासाठी पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली होती. गत निवडणुकीत 2014 साली 2 लाख 97 हजार 700 मतदाना पैकी 1 लाख 77 हजार 539 मतदान होऊन याची सरासरी 69.63 टक्के झाली होती.