Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीसातारारोड येथील अर्जुन जाधव यांचा खून

सातारारोड येथील अर्जुन जाधव यांचा खून

अज्ञात व्यक्तीकडून धारदार शस्त्राने वार; गुन्हा दाखल
कोरेगाव : सातारारोड, ता. कोरेगाव येथे शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी मृतावस्थेत आढळून आलेल्या अर्जुन बाजीराव जाधव वय 65, मूळ रा. भोसरे, ता. खटाव व हल्ली रा. सातारारोड यांचा धारदार शस्त्राने वार करुन खून झाल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक तपास व शवविच्छेदन अहवालाच्या आधारे कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, अर्जुन जाधव यांचा मृतदेह सातारारोडमधील ग्रामस्थ व शेतकर्‍यांना धोम डाव्या कालव्याच्या बाजूस आढळून आला होता. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर आणि कुटुंबियांकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर अकस्मात मयत अशी नोंद पोलीस ठाण्याच्या दफ्तरी केली होती. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी सातारारोड पोलीस दूरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे व पोलीस नाईक अमोल सपकाळ यांनी सुरु केली होती.
मृतदेहाचे कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते. त्याचा अहवाल आल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांकडे मृत्युचे निश्‍चित कारण व अंगावरील जखमांबाबत अहवाल पोलिसांनी मागितला होता. त्यामध्ये धारदार शस्त्राने वार करुन खून केला असल्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे साळुंखे यांनी तपासाची चक्रे गतिमान केली होती. त्यांनी घटनास्थळ व परिसर पिंजून काढल्यानंतर तीन ते चार ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले. जाधव यांच्या चप्पला देखील दुसरीकडे पडल्याचे दिसले. साळुंखे यांनी सातारारोड व परिसरातील 12 जणांच्या साक्षी नोंदवत तपास केल्यावर अर्जुन जाधव यांचा खून झाला असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांनी ही बाब उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड व पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे साळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत साबळे तपास करत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular