कोरेगाव: घामातून मोती पिकविण्याचे काम करणारे कष्टकरी कामगार हीच आपल्या भारत देशाची खरी उर्जा असल्याचे प्रतिपादन कोरेगांव विकास मंचचे अध्यक्ष व खरेदी विक्री संघाचे संचालक किशोर बर्गे यांनी व्यक्त केले.
कामगार दिनानिमित्त येथील एस. टी. आगारातील चालक, वाहक व यांत्रीकी कर्मचार्यांचा गौरव कोरेगाव शहर विकास मंचच्या वतीने करण्यात आला, त्याप्रसंगी किशोर बर्गे बोलत होते. आगार प्रमुख पृथ्वीराज भुताळे, निवृत्त वाहतुक निरीक्षक रामचंद्र बोतालजी, युवराज केंजळे, विकास मंचचे कार्याध्यक्ष दिलीपराव बर्गे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
किशोर बर्गे यावेळी म्हणाले, कष्टकर्यांचा सन्मान करणारी आपली संस्कृती आहे. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार आणि जवानांच्या ताकदीवर आपला देश सन्मानजनक प्रगती करु शकला. या सर्वांचा सन्मान करण्यासाठी कामगार दिन साजरा केला जात असला तरी या सर्वांप्रती समाजाच्या प्रत्येक घटकाने कायमच ऋण व्यक्त केले पाहिजेत, आजचा हा उपक्रम एस.टी. कामगारांचे आत्मबल उंचावण्यासाठी पुरक असून प्रत्येक क्षेत्रातील कामगारांच्या पाठिशी कोरेगांव विकास मंच कायमच राहिल असा विश्वासही किशोर बर्गे यांनी व्यक्त केला.
यावेळी आगार प्रमुख पृथ्वीराज भुताळे यांनी एस.टी. कामगारांच्या सत्कारा बद्दल कृतज्ञता व्यक्त करुन पूर्वी इतकेच दर्जेदार काम करुन एस.टी. प्रशासनाची भूमिका कार्यक्षमपणे पार पाडली जाईल, एक अधिकारी म्हणूनच नव्हे तर व्यक्ती म्हणून आपले या तालुक्याच्या वाटचालीत चांगले योगदान राहिल असेही त्यांनी सांगितले.
एस. टी. कामगारांच्या वतीने युवराज केंजळे यांनी कृतज्ञता व्यक्त करुन आमचा आज झालेला सन्मान नवी उर्जा देणारा असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमास एस. टी. आगारातील अधिकारी, वाहक, चालक, कार्यशाळेतील कर्मचारी उपस्थित होते.
कष्टकरी कामगार हीच देशाची उर्जा: किशोर बर्गे
RELATED ARTICLES