Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीवाई तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी, वाई शहर झाले भगवेमय

वाई तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी, वाई शहर झाले भगवेमय

जय-भवानी जय शिवाजीच्या निनादात निघाल्या भव्य मिरवणुका
वाई : हिंदवी स्वराज्य संस्थापक युग पुरुष छ. शिवाजी महाराज यांची जयंती वाई तालुक्यात शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त कृष्णा पुलावर भगवे झेंडे व पताका लावण्यात आल्या होत्या. संपूर्ण वाई शहर भगवेमय झाले होते. आज सकाळी सहा वाजलेपासून विविध शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणलेल्या शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले. वाईच्या छ.शिवाजी चौकात व वाई पोस्ट ऑफिस समोर आखिल सोनगीरवाडी शिवजयंती उत्सव मंडळ, वाई तालुका शिवजयंती उत्सव मंडळ, रविवार पेठ शिवजयंती उत्सव मंडळ, गंगापुरी शिवजयंती मंडळ यांच्या वतीने शहरात आलेल्या शिवज्योतींचे मंडळाच्या पदाधिकार्यांनी भव्य स्वागत केले. छ.शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवज्योती प्रतापगड, शिवनेरी, रायगड, तोरणा, सिंहगड या गडांवरून आणण्यात आल्या होत्या. मोठमोठाले ध्वज लावण्यात आल्याने सकाळ पासूनच वातावरण शिवमय झाले होते. मावळे प्रचंड उत्साहात दिसून येत होते. पसरणी सारख्या ग्रामीण भागात शिवजयंतीचा उत्सव छ. शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर भव्य रांगोळी स्पर्धा व विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शिवजयंतीच्या उत्सवात विविध पक्षांच्या पदाधिकारी, व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. जय भवानी जय शिवाजी च्या निनादात व छ.शिवाजी महाराजांच्या पोवाड्यांनी शहरासह संपूर्ण तालुका शिवमय झाला होता.
तसेच सायंकाळी सहा वाजता शहरासह ग्रामीण भागातही भव्य मिरवणुका काढण्यात आली. मिरवणुकीत पारंपारिक रूढी नुसार वाद्यांचा वापर मंडळाच्या पदाधिकार्यांनी केल्याचे दिसून आले, तर फुलांनी सजविलेल्या रथात छ. शिवाजी महराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. पोलिसांनी डॉल्बी वाजवण्यावर बंदी घातल्याने मावळ्यांच्या उत्साहावर विरजण पडले. त्यामुळे काही मंडळांनी ऐतिहासिक सजावटीसह घोडे, उंट, यांना प्राधान्य दिल्याचे दिसले.फटाक्याच्या आतीशबाजीत सिद्धनाथवाडी येथील सायली कट्टा शिवजयंती उत्सव मंडळ, आखिल सोनगीरवाडी शिवजयंती उत्सव मंडळ, वाई तालुका शिवजयंती उत्सव मंडळ, गंगापुरी शिवजयंती मंडळ, रविवार शिवजयंती मंडळ यांनी भव्य मिरवणुका काढून शिवकालीन वातावरणाचा वाईकरांना आंनद दिला. यावेळी निघालेल्या ऐतिहासिक मिरवणुका पाहण्यासाठी बाल-अबाल वृध्द यांनी वाई किसनवीर चौकात तुडूंब गर्दी केली होती. मिरवणुकी मध्ये वाई पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. किसनवीरसह वाई शहरातील सर्व चौकांमध्ये ढोल ताशांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली, डॉल्बीवर बंदी घातल्याने पारंपारिक वाद्याला मात्र सुगीचे दिवस आले आहेत, तर मिरवणुकीत डॉल्बी न वाजल्याने वाईकर नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
मावळ्यांनी उत्साहाला आवर घालण्याची गरज
महाराष्ट्रातील विविध गडावरून शिवजयंती निमित्त शिवज्योती आणण्यात येतात, यावेळी अनेक कार्यकर्ते उत्साहाच्या भरात चुकीच्या गोष्ठी करीत असतात, गाडीला कर्कश हॉर्न बसविणे, टूव्हिलरवरून ट्रिपल सीट जाणे, माद्यमान करणे, बेभान गाडी चालविणे, अशा चुकीच्या गोष्ठी केल्याने अनेक वेळा उत्साहावर पाणी फिरते. विपरीत घटना घडून उत्साहाला काळींबा फासण्याचे कृत्य घडल्याने संपूर्ण शिवजयंती उत्सवाला गालबोट लागते, तरी शिवजयंती मंडळाच्या जबाबदार पदाधिकार्यांनी यावर आवर घालण्याची गरज आहे, छ.शिवाजी महाराज तमाम महाराष्ट्र वासियांचे दैवत आहे. कार्यकर्त्याच्या छोट्याशा चुकीमुळे उत्सव बदनाम होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
– एक शिवभक्त.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular