Thursday, June 26, 2025
Homeताज्या घडामोडीचारा छावणीच्या प्रलंबित प्रस्तावावर तात्काळ निर्णय घ्याःडॉ. दिपक म्हैसेकर

चारा छावणीच्या प्रलंबित प्रस्तावावर तात्काळ निर्णय घ्याःडॉ. दिपक म्हैसेकर

सातारा : माण तालुक्यात शासनाने मंजूर केलेल्या चारा छावण्या सुरु आहेत. माण तालुक्यातील मोगराळे व वडगाव या चारा छावण्यांस आज भेट दिली. चारा छावणीतील जनावरांना शासनाच्या निकषानुसार चारा, पेंड व पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे. चारा छावणीचे प्रस्ताव मंजूरीसाठी प्रलंबित असल्यास त्यावर तात्काळ निर्णय घ्या, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज केल्या.
दहिवडी येथील तहसील कार्यालयात टंचाई आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपायुक्त प्रतापराव जाधव, उपायुक्त निलीमा धायगुडे, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सूनिल थोरवे, माणचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, फलटणचे प्रांताधिकारी संतोष जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रोहयोंतर्गत सार्वजनिक कामांचे प्रस्ताव आले तर त्यास तात्काळ मंजूरी द्या, अशा सूचना करुन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर पुढे म्हणाले, टँकरच्या खेपा शंभर टक्के होण्यावर भर द्या, टँकरचे मॉनिटरींग जीपीएसच्या माध्यमातून मोबाईलद्वारे करावे. हे काम संबंधित तालुक्याचे तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी करावे. टँकरच्या खेपा लॉगबूकशीटशी पडताळून पहावे. धरणातून सोडण्यात येणारा पाणीसाठा हा फक्त पिण्यासाठीच उपलब्ध करुन देण्यात यावा, शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होणार नाही, याची दक्षता संबंधित अधिकार्‍यांनी घ्यावी. तसेच चारा छावण्यांबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सूचनांचे पालन चारा छावण्या तंतोतंत करतील यासाठी अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केल्या.
विभागीय आयुक्तांनी टंचाईच्या उपायासंदर्भात विविध सूचना केल्या आहेत, या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पूढे म्हणाल्या, टंचाई भागातील पाणी उपसा शंभर टक्के बंद झाला पाहिजे. यासाठी महसूल विभाग, इरिगेशन विभाग यांनी समन्वयाने काम करावे. ज्या ठिकाणी अवैध पाणी उपसा होत असेल त्या ठिकाणचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीने तात्काळ काढून टाकावे. प्रलंबित चारा छावणीचे प्रस्ताव दोन दिवसांत पाठवा. टंचाई उपाय योजनेसाठी अधिका-यांनी आता फिल्डवर येऊन काम केले पाहीजे. टंचाई कामात लक्ष केंद्रीत करुन कामे गतीने करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केल्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular