Thursday, October 23, 2025
Homeठळक घडामोडीसोशल मिडियावरील स्वयंघोषित डॉक्टर्सचा सुळसुळाट थांबविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राने पुढाकार घ्यावा : राज्यपाल

सोशल मिडियावरील स्वयंघोषित डॉक्टर्सचा सुळसुळाट थांबविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राने पुढाकार घ्यावा : राज्यपाल

कराड: गेल्या काही वर्षात सोशल मिडियाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक स्वयंघोषित डॉक्टर्स समाजमाध्यमांतून आरोग्यविषयक सल्ले व चुकीची माहिती पसरवत आहेत. दुर्दैवाने या संदेशांची कोणतीही खातरजमा न करता अनेक रूग्ण या सल्ल्यांची अंमलबजावणी करत असल्याने आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहेत. सोशल मिडियावरील अशा स्वयंघोषित डॉक्टर्सचा सुळसुळाट थांबविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या 8 व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख अतिथी या नात्याने ते बोलत होते. त्यांनी या सोहळ्यात मुंबई येथील राजभवनातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा होते.
कृष्णा विद्यापीठाच्या प्रांगणात खास उभारलेल्या शामियानात हा दीक्षांत सोहळा रंगला. विद्यापीठाच्या मुख्य कार्यालयापासून पोलिस दलाच्या विशेष बॅन्डपथकाच्या मानवंदनेत प्रमुख पाहुण्यांना समारंभस्थळी नेण्यात आले. व्यासपीठावर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले, कुलगुरु डॉ. नीलिमा मलिक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिंगारे, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य विनायक भोसले, मनिषा मेघे, डॉ. स्वप्ना शेडगे, दिलीप पाटील, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, परीक्षा नियंत्रक डॉ. आर.के. गावकर, संशोधन संचालक डॉ. अरूण रिसबुड, अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अगरवाल, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल अ‍ॅडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात विद्यापीठातील 558 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 14 जणांना कुलपती डॉ. वेद्रपकाश मिश्रा यांच्या हस्ते पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध अधिविभागात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथील राजभवनातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना राज्यपाल म्हणाले, की सामाजिक बदलाचे प्रणेते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या दूरदृष्टीतून उभारलेल्या कृष्णा विद्यापीठामुळे ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाबरोबरच गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली आहे. आज हे विद्यापीठ सर्वच क्षेत्रात यशोशिखरावर पोहचत असून, लवकरच राष्ट्रीय पातळीवरील नामांकित विद्यापीठ म्हणून ते नावारूपाला येईल याची मला खात्री आहे.
भारतात गेल्या काही वर्षात जीवनशैलीमुळे होणार्‍या व्याधींचे प्रमाण वाढले असून, मधुमेह, हृदयविकार यासारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. तसेच आजही ग्रामीण भारतात डॉक्टरांचे प्रमाण अत्यल्प असल्याने वैद्यकीय सेवासुविधा मिळण्यास अडचण निर्माण होत आहेत. अशावेळी सामान्य लोकांपर्यंत अधिकाधिक आरोग्यसुविधा पोहचविण्यासाठी नवोदित डॉक्टर्सनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल यांनी केले.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की कृष्णा विद्यापीठ ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून संशोधन, नवनिर्मितीला चालना देणारे ज्ञानकेंद्र आहे. विशेषत: वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्याचे कार्य करतानाच, तळागाळतील समाजापर्यंत आरोग्यसेवा पोहचविण्याचे आणि आरोग्याबाबत लोकजागृती करण्यावे काम कृष्णा विद्यापीठ करत आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, की स्व. जयवंतराव भोसले यांच्या दूरदृष्टीतून आणि डॉ. सुरेश भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाने कृष्णा अभिमत विद्यापीठ आज उत्तुंग शिखरावर पोहचले आहे. त्यांच्या या दूरदृष्टीला सलाम करावासा वाटतो. आज या संस्थेतून पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांवर फार मोठी सामाजिक जबाबदारी आली आहे. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी समाजात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी, एकमेवाद्वितीय बनण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा करण्याची तयारी ठेवावी. जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय्यनिश्चिती, कामाप्रती निष्ठा, कृतीशीलता यांना महत्व द्यायला हवे. तसेच सामाजिक उत्तरदायित्वही जपले पाहिजे.
सोहळ्याला यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका उत्तरा भोसले, कृष्णा फौंडेशनच्या संचालिका गौरवी भोसले, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कृष्णा वैद्यकीय विज्ञान विभागप्रमुख डॉ.एस.टी.मोहिते, दंतविज्ञान विभागप्रमुख डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपीचे विभागप्रमुख डॉ. जी. वरदराजुलु, नर्सिंग विज्ञानच्या विभागप्रमुख डॉ. वैशाली मोहिते, अलाईड सायन्सचे विभागप्रमुख डॉ. एस. सी. काळे, अधिष्ठाता डॉ. सुप्रिया पाटील, डॉ.रेणुका पवार, डॉ. टी. पूविष्णू देवी, डॉ.ज्योती साळुंखे, स्नेहल मसूरकर, अक्षदा कोपर्डे यांच्यासह विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular