Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीऔंध येथील जागतिक दर्जाच्या श्रीभवानी वस्तू चित्रसंग्रहालयातील सुमारे सात हजार दुर्मिळ कलाकृती...

औंध येथील जागतिक दर्जाच्या श्रीभवानी वस्तू चित्रसंग्रहालयातील सुमारे सात हजार दुर्मिळ कलाकृती पर्यटकांना शनिवारी मोफत पाहण्यासाठी खुल्या केल्या जाणार ; जागतिक संग्रहालय दिनानिमित्त प्रशासनाचा निर्णय , पर्यटकांंसाठी पर्वणी

औंध (वार्ताहर):-सातारा जिल्हयासह राज्याचे भूषण असलेल्या जागतिक दर्जाच्या औंध येथील श्रीभवानी वस्तू चित्रसंग्रहालया मध्ये शनिवार दि.अठरा रोजी जागतिक वस्तू संग्रहालय दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांंचे आयोजन केले जाणार आहे. त्याचबरोबर शनिवारी दिवसभर सर्व पर्यटकांसाठी हे संग्रहालय एक दिवस मोफत खुले ठेवले जाणार आहे. विविध दुर्मिळ कलाकृतींचा खजिना असलेल्या औंधच्या संग्रहालयास प्रत्येकाने एकदा तरी अवश्य भेट देऊन त्याची पाहणी करावी अशा या संग्रहालयाविषयीचा थोडक्यात घेतलेला हा मागोवा.

राज्यातील पुरातत्व विभागाच्या तेरा संग्रहालयापैकी औंधचे श्रीभवानी वस्तूचित्रसंग्रहालय हे वैविध्यपूर्ण सुमारे सात हजार कलाकृतींचा खजिना असलेले एकमेव संग्रहालय आहे.

एकोणीसशे अडतीस साली औंध संस्थानचे अधिपती कै.बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी दुरदृष्टीतून या संग्रहालयाची मूळपीठ डोंगराच्या मध्यवर्ती भागावर असलेल्या ठिकाणी निर्मिती केली. पूर्वी छोटेखानी असलेल्या या संग्रहालयाचा मागील ऐंशी वर्षात मोठा विस्तार करण्यात आला आहे.
माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार व औंंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी संग्रहालयाची जुनी इमारत कलाकृती मांडणीसाठी कमी पडत असल्याचे ध्यानात घेऊन मागील दहा वर्षापूर्वी संग्रहालयाच्या विस्तारित इमारतीचे काम केले. त्यासाठी सुमारे दिड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.
संग्रहालयातील दुर्मिळ पेंटींग्जमध्ये राजा रविवर्मा यांची तीन महत्वाची पेंटींग्ज आहेत. यामध्ये सैरंद्रि, मल्याळ स्त्री,दमयंती यांची देखणी पेंटिंग्ज पाहण्यासारखी आहेत.
त्याचबरोबर ठाकूरसिंग यांचे ओलितीचे
पेंटींग्ज जागतिक दर्जा आहे.बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी रामायणातील प्रसंग रेखाटले आहेत.
त्याचबरोबर शिवकालीन वस्तू, हत्यारे ,धातूच्या, विविध प्राण्यांच्या शिंगाच्या वस्तू आहेत.
कर्नाटकातील सुप्रसिद्ध कारागीर रामचंद्र सुबराव गुड्डीगार यांनी चंदनाच्या लाकडावर कोरलेले रामायण व शिवचरित्राचे प्रसंग सर्वांनाच मोहित करतात.तसेच पाथरवट यांनी हस्तीदंतावरती कोरलेली कला तर अचंबित करण्यासारखी आहे. त्यामुळे इतिहास संशोधक,अभ्यासक तसेच आजच्या नवीन पिढीला प्रेरणा व प्रोत्साहन देणार्या अनेक दुर्मिळ कलाकृती, पेंटींग्ज, वस्तू संग्रहालयामध्ये आहेत.

संग्रहालयामध्ये भरतकाम केलेल्या अनेक कलाकृती पाहावयास मिळतात.
त्याचबरोबर बाळासाहेब महाराज पंतप्रतिनिधी परदेशात गेले होते त्यावेळेस अनेक दुर्मिळ वस्तू त्यांनी संग्रहीत केल्या होत्या .त्यामध्ये विविध दुर्मिळ कँमेरे, जपानी वस्तू, पेंटींग्ज तसेच अन्य वस्तू आणल्या होत्या त्याही याठिकाणी मांडल्या आहेत.

औंध संग्रहालयामध्ये गँलरी, कोर्टयार्ड तसेच अठरा दालनात यासर्व सुमारे सात हजार वस्तू ,दुर्मिळ कलाकृती मांडल्या आहेत.
पर्यटकांसाठी ही अपूर्व पर्वणी आहे.
महाराष्ट्र नव्हेच देशातील एवढया मोठ्या दुर्मिळ कलाकृतींचा खजिना असलेले औंध येथील श्रीभवानी चित्रसंग्रहालय हे एकमेव संग्रहालय आहे.

त्याचबरोबर संग्रहालय परिसरात सुंदर बगीचा पर्यटकांसाठी बैठक व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळणी ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे हा परिसर आल्हाददायक व सुंदर बनला आहे. संग्रहालय बाहय परिसरात ही ऐतिहासिक चारशे बासष्ट पायर्या आहेत. त्याठिकाणी विविध प्रकारचे संगमरवरी पुतळे बसविण्यात आले आहेत.

संग्रहालय सुरक्षेसाठी सुमारे दोनशे तीस कँमेरे, पोलीस सिक्युरिटी गार्ड पथक तैनात करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया.. .. जागतिक दर्जाच्या औंधच्या श्री भवानी वस्तू व चित्रसंग्रहालयामध्ये शनिवारी जागतिक वस्तूसंग्रहालय दिनानिमित्त सर्व पर्यटकांसाठी हे संग्रहालय मोफत खुले ठेवले जाणार आहे त्याचबरोबर शासननिर्णयानुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे तरी सर्वानी यासुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
उदय सुर्वे क्युरेटर (औंध संग्रहालय)

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular