Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीकोरेगावातील अवैध वाळू उपशावर कारवाई

कोरेगावातील अवैध वाळू उपशावर कारवाई

11 जणांविरोधात गुन्हा दाखल; 7 जणांना पोलीस कोठडी; 62 लाखांचा मुद्देमाल जप्त
कोरेगाव : कोरेगाव-जळगाव रस्त्यावर वांगणा नदी पात्रालगत मळवी नावाच्या शिवारात अवैधरित्या सुरु असलेल्या वाळू उपश्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी सकाळी 6.30 च्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत 61 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पंचायत समितीचे माजी सभापती संजय झंवर, उपनगराध्यक्ष संजय पिसाळ यांच्यासमवेत 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, की सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख हे रविवारी रात्री जिल्हा रात्रगस्तीवर होते. गस्त संपवून ते सातार्‍याकडे परतत असताना, त्यांना एका खास बातमीदाराने कोरेगावातील मळवी नावाच्या शिवारात अवैधरित्या वाळू उपसा सुरु असल्याची माहिती दिली. त्यानुसार शेख यांनी आपल्या पथकासह कोरेगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांना पाचारण करुन थेट घटनास्थळी जाऊन कारवाई केली. घटनास्थळी त्यांना वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर, एक जेसीबी, चार दुचाकी आढळून आल्या.
जेसीबी चालक राजू जाधव, करण फडतरे, अजय फडतरे व ट्रॅक्टर चालक इंद्रजित जाधव यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर संजय पिसाळ, संजय झंवर, सुधीर बर्गे व मोहन शिंदे यांच्यासाठी वाळू उत्खनन करत असल्याचे सांगितले. त्याचवेळी फॉर्च्युनर कार घेऊन संजय पिसाळ व दीपक डेरे तेथे पोहोचले असता, शेख यांनी सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्या आदेशानुसार ठाणे अंमलदार सत्यवान बसवंत यांनी फिर्याद दिली असून, वाळू उपसाप्रकरणी सुधीर बर्गे, राजू जाधव, करण फडतरे, अजय फडतरे, इंद्रजित जाधव,दीपक डेरे व रोहन फडतरे यांना अटक करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयात सर्वांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले, त्याचवेळी पिसाळ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कोरेगाव न्यायालयात न्या. ए. एस. जगताप यांच्यासमोर 7 जणांना हजर केले असता, त्यांनी तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड तपास करत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular