Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीपालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी 13 लाख रुपये खर्चाच्या ठरावाला मंजूरी

पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी 13 लाख रुपये खर्चाच्या ठरावाला मंजूरी

आरोग्य सभापती अजय माळवे यांनी मांडलेल्या ठरावाला पालिकेत मान्यता
फलटण : आषाढी वारी दरम्यान फलटण शहरात येणार्‍या संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहोळ्याचे स्वागत आणि सोहोळ्यातील वारकरी व भाविकांना द्यावयाच्या विविध सेवा, सुविधांच्या सुमारे 13 लाख रुपये अपेक्षित खर्चाच्या निविदा काढण्याच्या आरोग्य सभापती अजय माळवे यांनी मांडलेल्या ठरावास फलटण नगर परिषद विशेष सभेत एकमताने मान्यता देण्यात आली.
फलटण नगर परिषद विशेष सभा आज (शुक्रवार) श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. निताताई मिलींद नेवसे होत्या. सभेस उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक / नगरसेविका, मुख्याधिकारी प्रसाद काटकर व त्यांचे सहकारी अधिकारी उपस्थित होते.
नगराध्यक्षा सौ. निताताई नेवसे यांनी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची फेरनिवड झाल्याबद्दल आणि सातारा व माढा लोकसभा मतदार संघातून अनुक्रमे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला तो सभागृहाने एकमताने मंजूर केला. अशोक जाधव यांनी दोन्ही नवनिर्वाचीत खासदार यांचा नगरपरिषदेच्यावतीने यथोचित जाहीर सत्कार करण्याची मागणी केली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउली पालखी सोहोळ्याच्या आषाढी वारी दरम्यान येथील वास्तव्यात विमानतळावरील पालखी तळावर दर्शनबारी, विद्युत प्रकाश योजना, चौकशी कार्यालय, दवाखाना, स्वागत कमानी, तात्पुरती शौचालये, पालखी तळावर दिंडीचे ठिकाणी आलबेली ठिकरी व तळ स्वच्छ करुन जंतुनाशक फवारणी करणे, शहरातील पालखी मार्गाची स्वच्छता, दुरुस्ती, पॅचवर्क, फिरते शौचालयाचे ठिकाणी विद्युत व्यवस्थेसाठी जनरेटर पुरविणे आणि वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी वरीलप्रमाणे सुमारे 13 लाख रुपये अपेक्षित खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
सोहोळ्याच्या येथील वास्तव्या दरम्यान गतवर्षी झालेल्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी योग्य दक्षता घेणे तसेच पालखी तळ आणि शहरात अग्निशमन दल सज्ज ठेवणे तसेच वीज, पाणी, आरोग्य वगैरे सुविधा केवळ पालखी तळावर न देता शहरात ज्या ठिकाणी दिंड्या थांबतात त्या प्रत्येक ठिकाणी या सुविधा द्याव्यात अशी मागणी सभेत करण्यात आली त्यालाही एक़मताने मान्यता देण्यात आली.
शहरातील समाजमंदिरे किंवा सामाजिक सभागृह ही नगर परिषदेच्या मालकीची असूनही त्याला खाजगी स्वरुप देण्यात येत असून त्यावर विविध संस्था संघटनांचे फलक लावण्यात येत आहेत. तेथील वीज पुरवठा खाजगी वापरासाठी दिला जातो याबाबी टाळण्यासाठी सदरची सर्व समाजमंदिरे व सामाजिक सभागृह नगर परिषदेने ताब्यात घेवून त्यावर नगर परिषदेच्या नावाचे फलक लावावेत प्रसंगी त्याचा वापर कसा कोणी करावा याची नियमावली तयार करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. त्याबाबत नगराध्यक्षांनी योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्याधिकार्‍यांना दिले प्रसंगी या वास्तुंची पाहणी करताना त्या भागातील नगरसेवकांना बरोबर घ्यावे अशा सूचनाही देण्यात आल्या.
शहरात खाजगी अथवा सार्वजनिक ठिकाणी देण्यात येणार्‍या पाणी पुरवठ्याच्या नळ जोडण्या सन 1984 च्या कायद्यातील तरतुदीनुसार पाणी पुरवठा समितीच्या मान्यतेनच देता येत असताना मलठण भागात अशा मान्यतेशिवाय देण्यात आलेले नळ संयोजन बंद करण्याचे निर्देश मुख्याधिकार्‍यांनी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणीनंतर दिले असून यापुढे पाणी पुरवठा समितीच्या मान्यतेशिवाय नळ जोडण्या देण्यात येणार नाहीत हे मान्य करण्यात आले.
सभागृहातील या चर्चेत नगराध्यक्षा सौ. नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, अनुप शहा, अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले, अजय माळवे वगैरेंनी सहभागी होवून संबंधित विषयाबाबत आपली मते मांडली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular