वडूज: वडूज येथील नगरपंचायतीच्या नवीन नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सोमवार दि. 10 रोजी सकाळी नामनिर्देशनपत्र सादर करणे, दुपारी छाननी प्रक्रिया, दि. 12 रोजी नामनिर्देशन फेटाळण्यात आलेल्या उमेदवारास अपिलाची मुदत व वैध उमेदवारांची यादी जाहीर करणे. गुरुवार दि. 13 रोजी माघार घेण्याची मुदत आहे. तर शुक्रवार दि. 14 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असल्याने दिवसेंदिवस स्पर्धा वाढतच चालली आहे. राजकारणाचे संदर्भ दररोज बदलत असल्याने अर्ज भरल्यानंतरच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
नगपंचायतीत राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रत्येकी 5, भाजपाचे तीन व अपक्ष चार असे बलाबल आहे. राष्ट्रवादीच्या गोटातून नगराध्यक्ष पदासाठी सुनिल हिंदुराव गोडसे यांचे नांव आघाडीवर आहे. काँग्रेसच्या गोटातून अपक्ष नगरसेवक शहाजीराजे गोडसे व डॉ. नीता प्रशांत गोडसे यांची नांवे चर्चेत आहेत. तर भाजपाच्या माध्यमातून बांधकाम सभापती वचनशेठ शहा स्पर्धेत आहेत. तर मागील निवडणूकीत झालेल्या चुका दुरुस्त करत अनिल माळीही ऐनवेळी आपले घोडे दामटू शकतात.
राष्ट्रवादीचे सुनिल गोडसे त्यांच्या पक्षाचे पाच नगरसेवक, दोन अपक्ष अशी गोळाबेरीज करुन बसले आहेत. नगरपंचायतीच्या राजकारणात अपवादात्मक परस्थिती वगळता राष्ट्रवादीला भाजपाची कायम साथ लाभली आहे. त्यादृष्टीने भाजपाचे तीन सदस्य त्यांना सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. त्या बदल्यात भाजपास उपनगराध्यक्ष पद मिळू शकते. सद्या श्री. गोडसे हे राष्ट्रवादीचे चार तसेच दोन अपक्ष नगरसेवकांना घेवून सहलीवर गेले असल्याची चर्चा आहे. तर मागील निवडणूकीत संघटनेवर नाराज असलेल्या नगरसेविका सौ. सुनिता कुंभार यांची समजूत काढण्यासाठी श्री. गोडसे यांच्यासह त्यांचे पिताश्री राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष हिंदुराव आण्णा व त्यांचे सहकारी युध्दपातळीवर प्रयत्न करत आहेत.
फोडा व राज्य करा ची काँग्रेसची रणनिती :
पाच महिन्यापूर्वी झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत डॉ. महेश गुरव यांनी काँग्रेसचे पाच, तीन अपक्ष व राष्ट्रवादीचा एक अशी 9 जणांची मोट बांधत नगराध्यक्ष पद पटकावले होते. मात्र आजच्या परस्थितीत त्यांच्या बाजूचे एक अपक्ष माजी उपनगराध्यक्ष संदिप निवृत्ती गोडसे हे राष्ट्रवादीच्या बाजूला झुकल्याचे चित्र आहे. तर मागच्या वेळेस नगराध्यक्ष पदाकरीता भाजपाचा उमेदवार असल्या कारणाने सौ. कुंभार यांनी विरोधी मत टाकण्याची गंमत केली होती. मात्र या खेपेस नगराध्यक्ष पदास स्वपक्षाचाच उमेदवार असल्या कारणाने त्यांना पक्षाच्या व्हीपची कडेकोट अंमलबजावनी करावी लागू शकते. अश्या परस्थितीत दोन मताची तुट भरुन काढण्यासाठी चानाक्ष डॉ. गुरव भाजपाला नगराध्यक्ष पदाची ऑफर देवू शकतात. त्यादृष्टीने वचन शहा त्यांच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे. माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकरांनीही पक्षास नगराध्यक्षपद जिकडे मिळेल तिकडे प्राधान्य द्या असा खासगीत सल्ला नगरसेवकांना दिल्याचे समजते. आमदार जयकुमार गोरे हेही आठ दिवसांपूर्वी काही झाले ? हे विसरुन उद्याच्या उज्वल भवितव्यासाठी शहांची पाठराखन करु शकतात. मात्र ही बाब वडूजमधील काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांना कितपत मान्य होणार ? हा संशोधनाचा भाग आहे.
अंतिम चेंडू भाजपाच्या हाती …. मात्र सिक्सर बरोबर कॅचआऊट होण्याचाही धोका
दोन्ही काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे भाजपास संधी आहे. सद्या पक्षाचे तिनही सदस्य एका विचारावर भक्कमपणे राहिले तर अंतिम चेंडू भाजपाच्या हाती आहे. मात्र भाजपाची उमेदवारी शहा किंवा अनिल माळी यांना मिळाल्यास काँग्रेसबरोबर असणारे दोन्ही अपक्ष नगरसेवक शेवटपर्यंत दम काढणार का ? हा प्रश्न राजकीय जाणकारांना सतावतो. ओपनच्या जागेवर इतर उमेदवार नको या मुद्यावर ऐनवेळी ङ्ग मराठा क्रांती म होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अश्या परस्थितीत विद्यमान उपनगराध्यक्ष विपुलशेठ गोडसे, माजी उपनगराध्यक्ष संदिप गोडसे यांचे नशीबही फळफळू शकते. याशिवाय भाजपामध्ये इच्छुकांच्या शर्यतीत बॅकफुटवर असलेल्या सौ. किशोरी पाटील यांचे नांवही नाट्यमयरित्या पुढे येवू शकते. अश्या परस्थितीत प्रत्यक्ष अर्ज भरल्यानंतर निवडणूकीचे अर्धे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
प्रत्यक्ष अर्ज भरल्यानंतरच वडूजचे चित्र स्पष्ट होणार
RELATED ARTICLES