सातारा : इंटरनॅशनल क्रिएटिव्ह आर्ट सेंटर (आयसीएसी) या संस्थेने अहमदाबाद पोलीस आणि सुरक्षा सेतू सोसायटी यांच्या सहकार्याने दि. 2 जून ते 5 जून पर्यंत आर्टिस्ट इन रेसिडेन्सी या कलाप्रदर्शन व प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी भारतातून 20 उत्कृष्ठ चित्रकारांची निवड केली होती. त्यामध्ये सातार्यातील नवोदित चित्रकार अथर्व उमेश मोटे याची निवड झाली होती. त्याने हे कलाप्रदर्शन व प्रात्यक्षिक नुकतेच यशस्वी पार पाडले आहे.
गुजरातमधील अहमदाबाद पोलीस व सुरक्षा सेतू सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रमजान ईद निमित्त सामाजिक सलोख्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. विविधतेतून एकता या विषयावर आधारित पेंटिंग्ज सर्व चित्रकारांनी सादर केली व त्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते. त्यासाठी भारतातून अनेक नावाजलेले चित्रकार आले होते तसेच हे प्रात्यक्षिक व प्रदर्शन पाहण्यासाठी तेथील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. आयसीएसीचे अध्यक्ष रविंद्र मार्डिया याच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम अहमदाबाद येथे पार पडला. तसेच या संस्थेने सर्व चित्रकारांना प्रायोजित केले होते. ही संस्था तरुण आणि नवोदित चित्रकारांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे.
या सर्व चित्रकारांच्या चित्रांचे अहमदाबादचे पोलीस आयुक्त ए. के. सिंग यांनी कौतुक केले. रविंद्र मार्डिया व पोलीस आयुक्त ए. के. सिंग यांनी चित्रकार अथर्व मोटे यांच्या चित्राचे विशेष कौतुक केले. अहमदाबाद पोलीस यांच्यावतीने रक्तदान शिबिर, डॉग शो, हॉर्स शो तसेच व्यसनमुक्ती अभियान इ. कार्यक्रमही यानिमित्ताने आयोजित केले होते. “या कार्यक्रमामुळे मला अनेक अनुभवी चित्रकारांच्या बरोबरीने काम करायला मिळाले. तसेच अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या त्यामुळे माझा आत्मविश्वास निश्चितच दुणावला आहे.” असे अथर्व मोटे याने सांगितले. तो सध्या सर जे.जे. उपयोजित कला महाविद्यालय येथे डिग्रीच्या दुसर्या वर्षात शिकत आहे.
अथर्व हा उमेश मोटे व डॉ. प्रतिभा मोटे यांना मुलगा असून सेवानिवृत्त वनसंरक्षक अधिकारी आर.ए.मोटे व दैनिक ग्रामोध्दारचे संपादक बापूसाहेब जाधव यांचा तो नातू आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे श्री.छ.आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, पाटखळ येथील कला महाविद्यालयाचे प्राचार्य चित्रकार धुमाळ सर, चित्रकार सागर गायकवाड, पोदार स्कुलचे कला शिक्षक गाडगीळ सर, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण तसेच अनेक मान्यवर व हितचिंतकांनी अभिनंदन केले.
फोटो : चित्रकार अथर्व मोटे याचे कौतुक करताना पोलीस आयुक्त ए.के.सिंग., व इतर मान्यवर.
अथर्व मोटे याने अहमदाबादमध्ये केले कलाप्रदर्शन प्रात्यक्षीक यशस्वी
RELATED ARTICLES