Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीकोरेगावच्या नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल

कोरेगावच्या नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल

कोरेगाव: कोरेगाव नगरपंचायतीच्या पुढील अडीच वर्षाच्या कार्यकालासाठी नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आघाडीच्या सौ. रेश्मा सुनील कोकरे यांनी दोन तर काँग्रेसतर्फे बाळासाहेब बाचल यांनी एक अर्ज दाखल केला. पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांनी छाननीमध्ये तीन्ही अर्ज वैध ठरविले आहेत.
कोरेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा पहिला कार्यकाल दि. 14 रोजी संपत असून, पुढील अडीच वर्षांसाठी नागरिकांचा इतर मागासप्रवर्गासाठी आरक्षण आहे. नगरपंचायतीमध्ये आ. शशिकांत शिंदे व किरण बर्गे यांची आघाडी असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 आणि काँग्रेसचे 3 सदस्य एकत्रित येऊन 11 जणांची आघाडी आहे. काँग्रेसच्या किशोर बाचल गटाच्या पाच सदस्यांसह विद्यमान नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे हे एकत्रित आले असून, त्यांचा 6 सदस्यांचा गट आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 2 ही वेळ होती. सकाळी 10.30 च्या सुमारास काँग्रेसतर्फे बाळासाहेब बाचल यांनी तर दुपारी 1.45 च्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आघाडीच्या रेश्मा सुनील कोकरे यांनी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे अर्ज दाखल केला. पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांनी दाखल झालेल्या तीन्ही अर्जांची छाननी करुन, ते वैध ठरविले. छाननी प्रक्रियेत मुख्याधिकारी विनायक र्औधकर, निवडणूक विभागाचे अव्वल कारकून सारंग जाधव, नगरपंचायतीचे अधीक्षक श्री खरात, बाळासाहेब सावंत, अजित बर्गे यांनी भाग घेतला.
सातार्‍यातील बैठकीत झाला एकमताने निर्णय
कोरेगाव नगरपंचायतीत आ. शशिकांत शिंदे व किरण बर्गे यांची आघाडी असून, दोघांचे मिळून 11 नगरसेवक आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतच पदवाटपाचा फॉर्म्युला ठरला होता, त्याप्रमाणे सातार्‍यात रविवारी रात्री शासकीय विश्रामधामावर खासदार उदयनराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. जयकुमार गोरे व किरण बर्गे यांच्या उपस्थितीत सर्वच नगरसेवकांची बैठक झाली. त्यामध्ये चर्चा होऊन नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या सौ. रेश्मा सुनील कोकरे यांचे नाव अंतीम करण्यात आले. उपनगराध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडेच राहणार असून, दि. 13 जून रोजी नगरसेवकांची बैठक घेऊन, त्यामध्ये नाव निश्‍चित केले जाणार आहे, अशी माहिती आ. शशिकांत शिंदे यांनी दिली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular