Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीचाफळ परिसरातील वाईन शॉपमधील दारुला दोन दिवसाची अनाधिकृत पोलीस कोठडी

चाफळ परिसरातील वाईन शॉपमधील दारुला दोन दिवसाची अनाधिकृत पोलीस कोठडी

सातारा – श्री राम मंदिरामुळे नाव लौकिक प्राप्त केलेल्या चाफळ परिसरात सध्या बेकायदेशीर दारु व मटका व्यवसायामुळे अनेकांची झोप उडाली आहे. त्यामुळे या व्यावसायाविरोधात जनमाणसामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. चाफळ परिसरातील वॉईन शॉपमधील पकडलेली दारुला दोन दिवसाची अनाधिकृत पोलीस कोठडी मिळाल्यामुळे उंब्रज पोलीस ठाण्यात सध्या हे दारुचे पंधरा बॉक्स मालकाच्या प्रतिक्षेत असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, उंब्रज पोलीस ठाण्यामध्ये शनिवार दि. 8 जून 2019 रोजी सायंकाळी 7 वाजता चाफळ रस्त्यावरील एका गाडीतून वॉईन शॉपमधून 15 बॉक्स दारुची ने-आण होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावरच पोलीस खात्यात नाव लौकिक प्राप्त केलेले पोलीस कर्मचारी दत्तात्रय लवटे व गोरख कुंभार यांनी मोठ्या शिताफीने या गाडीचा पाठलाग करुन कैलास वॉईन शॉपमधून आणलेल्या दारुच्या 15 बॉक्स जप्त केले अशी चर्चा होत आहे. त्यानंतर सदरची दारु उंब्रज पोलीस ठाण्यात आणण्यात आली. या गोष्टीला 48 तास उलटल्यानंतर सुध्दा कोणताच गुन्हा दाखल न झाल्यामुळे सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात होते. विशेष म्हणजे चाफळ परिसरात चोरटी दारु वाहतूक व विक्री ही नित्याचीच बाब झाली असताना आपले कर्तव्य पार पाडणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांनी दारु पकडून सुध्दा त्याबाबत गुन्हा दाखल होत नसल्याने या दारुचा घमघमाट सर्वत्र पसरु लागलेला आहे. मुळातच हे प्रकरण फारसे गंभीर नाही अशा अर्विभावात असलेल्या काहींनी या 15 बॉक्सची विल्हेवाट लावण्याचीही तयारी केली होती. परंतु उंब्रज पोलीस ठाण्यात याबाबत विचारणा होताच पोलीसांनी पोलीस तपास सुरु आहे हे सांगण्याऐवजी याबाबत काही माहित नाही असे स्पष्टीकरण दिल्यामुळे अनेकांना आश्‍चर्य वाटत आहे.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून तेजस्वी सातपुते या कर्तबगार असून यापूर्वीच्या पोलीस अधिक्षकांनी पोलीस यंत्रणेबाबत जनतेमध्ये विश्‍वासार्हता निर्माण करण्यासाठी काम चुकार करणार्‍या पोलीसांना निलंबनाची कारवाई केली होती. त्यामुळे पोलीस दलाला एक धाक राहिला होता असाच धाक यापुढेही पोलीस अधिक्षक ठेवतील असा यानिमित्त विश्‍वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि गोरड यांच्याशी संपर्क साधला असता या दारुची मालकी कोणाची आहे याची चौकशी करुन पुढील कारवाई केली जाईल असे सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular