Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीपाटणच्या नगराध्यक्षपदी संजय चव्हाण बिनविरोध ; उपनगराध्यक्षपदी सचिन कुंभार यांची वर्णी ;...

पाटणच्या नगराध्यक्षपदी संजय चव्हाण बिनविरोध ; उपनगराध्यक्षपदी सचिन कुंभार यांची वर्णी ; निवडीनंतर नगरसेविका श्रीमती सरस्वती खैरमोडे यांचा राजीनामा ; मिरवणुकीचा डी.जे. पोलिसांकडून जप्त.

पाटण दि. १४ ( प्रतिनिधी ) पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय जयवंत चव्हाण यांची तर उपनगराध्यक्ष पदी सचिन किसन कुंभार यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे पाटण नगरपंचायतीवर पुन्हा एकदा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाचे एकतर्फी वर्चस्व सिद्ध झाले आहे. यावेळी नुतन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचे विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर यांनी अभिनंदन केले.

सोमवारी पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी संजय चव्हाण यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली होती. याबाबतची अधिकृत घोषणा आज शुक्रवारी करण्यात आली. याशिवाय शुक्रवारी उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव सचिन कुंभार यांचा अर्ज दाखल झाल्याने सचिन कुंभार यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मलकापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ. संजीवनी दळवी यांनी काम पाहिले. या निवडीनंतर सत्यजीतसिंह पाटणकर यांच्या हस्ते या दोन्ही मान्यवर नूतन पदाधिकारयांचा सत्कार करण्यात आला. या निवडीनंतर कार्यकर्ते, हितचिंतकांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण व घोषणाबाजी करत जल्लोष केला. या निवडीनंतर या नूतन पदाधिकारयांचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजीतसिंह पाटणकर, पंचायत समिती सभापती सौ. उज्ज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, सरचिटणीस सुभाषराव पवार, पाटणच्या मावळत्या नगराध्यक्षा सौ. सुषमा महाजन, उपनगराध्यक्ष दिपक शिंदे आदी मान्यवर, नगरसेवक विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी अभिनंदन केले.

निवडीनंतर नगरसेविका श्रीमती सरस्वती खैरमोडे यांचा राजीनामा.

पाटण नगरपंचायतीच्या अधिक्रुत एकुण सतरा नगरसेवकांपैकी नऊ महिला नगरसेविकांचा समावेश आहे. तर आठ पुरुष नगरसेवक आहेत. नगराध्यक्षा सौ. सुषमा महाजन उपनगराध्यक्ष दिपक शिंदे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष पदी संजय चव्हाण यांची निवड झाली. असताना उपनगराध्यक्ष पदी महिला नगरसेविकांची संख्या लक्षात घेऊन उपनगराध्यक्ष पदी महिला नगरसेविकाची निवड होईल असे अनेकांना वाटत होते. तसा प्रयत्न महिला नगरसेविका श्रीमती सरस्वती खैरमोडे, सौ. योगिता कुभांर, सौ. रश्मी राऊत यांनी केला होता. मात्र यांच्यात एकमत न झाल्याने उपनगराध्यक्ष पदी सचिन कुभांर यांची निवड करण्यात आली. असता प्रभाग क्रमांक सहा च्या नगरसेविका श्रीमती सरस्वती खैरमोडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष सौ. सुषमा महाजन यांच्याकडे दिला. यांच्या राजिनाम्याने पाटण शहरात एकच खळबळ उडाली.

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीनंतर निघालेल्या मिरवणुकीतील डी.जे. पोलिसांनी केला जप्त.

पाटण नगरपंचायतीची आज झालेल्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीनंतर कार्यकर्ते समर्थकांनी नुतन नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष सचिन कुभांर यांची डी.जे. लाऊन पाटण शहरातून मिरवणूक काढून कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु असताना पाटण पोलिस स्टेशनचे पो. नि. उत्तमराव भापकर व त्यांच्या टीमने विनापरवाना चाललेली मिरवणूक बंद पाडून डी. जे. जप्त केला. यावेळी कार्यकर्त्यांचा मात्र हिरमुस झाला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular