पाटण दि. २६ ( प्रतिनिधी ) पाटण विधानसभा मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या पाटण शुगर केन या ऊस प्रक्रिया प्रकल्पाचा भूमीपुजन समारंभ शुक्रवार दि. २८ जून रोजी सकाळी १० वाजता पाटण शहरानजीकच्या पिंपळोशी येथे होणार असल्याची माहिती युवा नेते सत्यजीतसिंह पाटणकर यांनी दिली.
याबाबत माहिती देताना सत्यजीतसिंह पाटणकर म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून येथे ऊसावर प्रक्रिया करणारा प्रकल्प व्हावा ही तमाम शेतकरी, ऊस उत्पादक, सुशिक्षित बेरोजगार, व्यावसायिक व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी होती. यासाठी आपण माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्नशील होतो. यासंदर्भातील तांत्रिक, कायदेशीर बाबींची पूर्तता करून आता आपण यात यशस्वी झालो असल्याने हे भुमिपूजन करत असून लगेचच तातडीने या नव्या प्रकल्पाच्या उभारणीला सुरूवात करणार आहोत. या नव्या प्रकल्पामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेला न्याय मिळणार आहे.
यामुळे शेतकरी, शेतमजूर, ऊस उत्पादक यांचा ऊस वेळेत गेल्याने त्याच्या वजनाचा त्यांना फायदा होईल याशिवाय प्रती टनाला स्पर्धात्मक अधिक दर मिळणार असल्याने शेतकरयांचे आर्थिक जीवनमान उंचावणार आहे. एका बाजूला यातून कोट्यावधीची आर्थिक उलाढाल होणार असल्याने पाटणसह मल्हारपेठ, नवारस्ता, कोयना, तारळे, मोरगिरी, चाफळ, ढेबेवाडी, कुंभारगाव, तांबवे-सुपने बाजारपेठात मोठ्या प्रमाणावर या पैशांची उलाढाल झाल्याने व्यापारयांनाही याचा फायदा होईल. या प्रकल्पात शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होईलच शिवाय यावर पुरक असे अनेक व्यवसायही करता येणार असल्याने निश्चितच शेकडो नव्हे तर हजारोंचे संसार यामुळे चांगले चालणार आहेत. त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेची या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वप्नपुर्ती झाली असून या मतदारसंघाला यामुळे सोन्याचे दिवस प्राप्त होणार आहेत. याच स्वप्नपुर्तीच्या या प्रकल्पाचा भूमीपुजन समारंभ शुक्रवार दि. २८ रोजी सकाळी दहा वाजता राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या शुभहस्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याने यावेळी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे. याशिवाय ज्यांना या कारखान्याचे शेअर्स घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी दि २८ जून ते १५ जुलै या कालावधी ठेवण्यात आला आहे. पाटण येथील कारखाना कार्यालयातून इच्छुकांनी शेअर्स मागणी अर्ज व सोबत पॅनकार्ड, आधारकार्ड, ७/१२ उतारा जोडून सोबत पाटण शुगरकेन प्रोड्युसर कंपनी, लिमिटेड या नावे दहा हजार रुपये रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट जोडून तो संबंधित कालावधीत या कार्यालयात जमा करावा असे आवाहनही शेवटी सत्यजीतसिंह पाटणकर यांनी केले आहे.