कराड : वैयक्तिक मतभेद सभागृहात आणायचे नाहीत. माझे नाव डायरेक्ट का घेताय? चौकशी करायचीच असेल तर सगळ्यांची चौकशी करा. सीबीआय चौकशी लावा, वैयक्तिक मतभेदाची चर्चा सभागृहात कशाला? असा सवाल करून सभागृहात माहिती घेतल्याशिवाय बोलू नका, असे ज्येष्ठ नगरसेवकांना सुनावत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे सभागृहात चांगल्याच गरजल्या. यावेळी संतापलेल्या नगराध्यक्षांनी अधिकार्यांना विषयांचे वाचन करण्याचे आदेश दिले.
कराड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी सौ. रोहिणी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या प्रारंभीच ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी पालिकेच्या घरकुलात बस्तान बसवलेले लोक बाहेर निघत नाहीत. अधिकार्यांच्या अंगावर जातात, असे का होत आहे? असे विचारून त्या लोकांना कोणी तरी गॉडफादर आहे, असे नगराध्यक्षांचे नाव न घेता सूचित केले. याबाबत त्यांनी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना जाब विचारुन ते लोक नगराध्यक्षांचे नाव घेत आहेत, असे सांगितल्यावर नगराध्यक्षा चांगल्याच भडकल्या. तुम्ही माझे नाव का घेत आहात? असा सवाल करुन तुम्ही माझ्यावर आरोप करत आहात? सभागृहात वैयक्तिक मतभेद आणू नका? वैयक्तिक बाबींवर सभागृहाबाहेर चर्चा करु. यावर पावसकर यांनी पालिकेतील गोपनीय कागदपत्रे बाहेर का जाताहेत? असा सवाल केला.
यावर पालिकेतील कागदपत्रे घेण्याचा माझा अधिकार आहे, मी ते माझ्या अभ्यासासाठी घेत असते. ती कागदपत्रे घरी घेऊन जात नाही, असे सांगितले. यावर पावसकर यांनी याबाबत चौकशी समिती नेमा, अशी मागणी केली.
या मागणीवर सौ. राहिणी शिंदे आणखीच भडकल्या. त्यांनी चौकशी सगळ्यांचीच करुन घ्या. समितीचे सदस्य तुम्हीच व्हा, असे सांगून सीबीआय चौकशीही लावा, असे सांगितले.
सुमारे 15 मिनीटे वादावादी झाल्यावर उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, नगरसेवक विजय वाटेगावकर, हणमंतराव पवार यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यावर सौ. रोहिणी शिंदे यांनी चर्चा बास झाली, विषयांचे वाचन करा, अशा सुचना दिल्या.
दरम्यान, सभेत विविध रिक्त पदे भरणे, लोकसहभागातून शहरात विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंचलित मशीन बसवणे, ठिकठिकाणी ड्रेनेज कनेक्शन जोडणी करणे, गटरलाईन दुरूस्ती करणे, बैलबाजार रोड रस्ता डांबरीकरण करणे, पी. डी. पाटील उद्यानामध्ये नागरिकांना निवार्यासाठी शेड उभारणे,
प्रितीसंगम बाग प्रवेशद्वार कमानीवर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनपटाची माहिती बोर्डवर तयार करून बसवणे, मुजावर कॉलनी येथील रस्ता खडीकरण करणे, वाढीव भागासाठी भुयारी गटर योजनेमधील ड्रेनेज पंपींग स्टेशनवर विहीर बांधणे आदी विषयांवा चर्चा करण्यात आली.
वैयक्तिक मतभेदांची चर्चा सभागृहात कशाला?
RELATED ARTICLES