कर्तव्यच्या पायलट प्रोजेक्टाचा शुभारंभ; शेळकेवाडीत 1335 झाडे लावली
सातारा : दरवर्षी अनेक संस्थांच्या आणि शासनाच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर वृक्षारोपण केले जाते. मात्र देखभाली अभावी ही झाडे पुढे जगत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. झाडे जगली पाहिजेत आणि पर्यावरण संवर्धन झाले पाहिजे यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी आम्ही हवी ती झाडे तुमच्या जागेत लावून देवू. तुम्ही ती जगवा, त्या झाडांचे मालक व्हा आणि फळे खा, असा अभिनव उपक्रम सुरु केला असून या महत्वकांक्षी उपक्रमाची सुरुवात प्रायोगिक तत्वावर शेळकेवाडी ता. सातारा येथून तब्बल 1 हजार 335 झाडे लावून करण्यात आली.
कर्तव्य सोशल ग्रुपच्या या पायलट प्रोजेक्टसाठी शेळकेवाडी ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ग्रुपने गावातील लोकसंख्येनुसार प्रत्येकाला हवे ते झाड मोफत दिले. यामध्ये कलमी आंबा, चिकू, पेरू, नारळ आदी फळझाडांचा समावेश आहे. ही झाडे दिल्यानंतर ग्रुपने जेसीबीच्या साह्याने संबंधीत ग्रामस्थांच्या जागेत झाडे लावण्यासाठी खड्डेही खोदून दिले. यानंतर या अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ सौ. वेदांतिकाराजे भोसले, शेळकेवाडी प्राथमिक शाळा, हायस्कूल, छ. शाहू अकॅडमीचे विद्यार्थी आणि शेळकेवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाडे लावून करण्यात आला.
यावेळी सरपंच संतोष शेळके, संभाजी शेळके सर, दिलीप शेळके, रेश्मा शेळके, विकाससेवा सोसायटीचे चेअरमन कृष्णराव शेळके, विठ्ठल शेळके, महेश शेळके, श्रीमंत शेळके, जगन्नाथ आढाव, वैभव आढाव, वनिता कदम, हायस्कूलचे प्रा. सुनिल धनवडे, दिनेश गवळी, गावित सर, दळवी सर यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित हेत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून जनजागृती केली. यानंतर कर्तव्य ग्रुपने दिलेल्या रोपांचे मान्यवरांच्या हस्ते ठिकठिकाणी रोपण करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सौ. वेदांतिकाराजे भोसले म्हणाल्या की, दरवर्षी पावसाळा सुरु झाला की, शासन आणि विविध संस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपण केले जाते. मात्र संवर्धन आणि देखभाल न झाल्याने ही झाडे जगत नाहीत हे वास्तव आहे. त्यामुळेच कर्तव्य सोशल ग्रुपने जे ग्रामस्थ लावलेल्या झाडाचे वृक्षात रुपांतर करण्यासाठी, त्यांचे संवर्धन करण्यासाठी इच्छुक आसतील त्यांना मोफत हवी ती झाडे देवून ती लावण्याचा निर्णय घेतला.
फक्त लावलेली झाडे त्या ग्रामस्थाने जगवली पाहिजेत, अशी अट आहे. आम्ही लावून दिलेल्या झाडाचे मालक व्हा आणि तुम्हीच त्या झाडाची फळे खा, फक्त झाडे जगवा आणि निसर्गाचे रक्षण करा या एकमेव उद्देशाने शेळकेवाडी येथे प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवला आहे. यासाठी शेळकेवाडीच्या ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभले असून इतर गावातील ग्रामस्थ इच्छुक असतील तर, त्याही गावात हा उपक्रम राबवणार असल्याचे सौ. वेदांतिकाराजे यावेळी म्हणाल्या.
साजरा होणार झाडांचा वाढदिवस
शेळकेवाडी येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्यांना हवी ती फळझाडे लावून देण्यात आली आहेत. ग्रामस्थांनीही उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी याच दिवशी शेळकेवाडी येथे लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे सौ. वेदांतिकाराजे याप्रसंगी म्हणाल्या. दरम्यान, संभाजी शेळके यांनी प्रत्येक झाड जगवलं जाईल आणि वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल, असे वचन ग्रामस्थांच्यावतीने यावेळी दिले.
झाडे जगवा, मालक व्हा, फळे खा उपक्रमाचा शुभारंभ
RELATED ARTICLES